प्रतिनिधी / वाकरे
कुडीत्रे (ता.करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को – ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि. न्यू दिल्ली या संस्थेकडून हंगाम २०१९-२० साठी राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च साखर उतारा पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली. डायरेक्टर ऑफ शुगर, भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या उच्चस्तरीय तज्ञांच्या समितीने या पुरस्कारासाठी कुंभी कासारी कारखान्याची निवड केली आहे. पुरस्कार वितरण २० मार्च २०२१ रोजी बडोदा, गुजरात येथे होणार आहे.
चेअरमन नरके यांनी कारखान्यास यापूर्वी सन १९९१-९२ मध्ये अखिल भारतीय पातळीवरील ऊस विकास कार्याबद्दलचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आणि उच्च साखर उतारा विभागातील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार, तसेच २०१७-१८ मध्ये नॅशनल फेडरेशन, न्यू दिल्ली यांचा सर्वोच्च साखर उतारा पुरस्कार मिळाला असल्याचे सांगितले. कारखान्यास सन
१९९२-९३,१९९३-९४,२००१-०२,२००४-०५,२०११-१२,२०१४-१५ आणि २०१७-१८ या वर्षासाठी उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेबद्दल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे यांच्याकडून पुरस्कार मिळालेले आहेत असे सांगितले.
चेअरमन नरके यांनी कारखान्याने नेहमीच उच्च साखर उतारा,ऊस विकास आणि तांत्रिक कार्यक्षमता राखण्याचा प्रयत्न केलेला आहे असे सांगितले. या पुरस्काराच्या यशात कारखान्याचे सर्व ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासद, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी वाहतूक संघटना, व्यापारी व कंत्राटदार यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.
कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव शुगर फॅक्टरीज, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे व महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लिमिटेड,मुंबई यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन निवास वातकर, संचालक बाजीराव शेलार, अनिल पाटील, विलास पाटील, किशोर पाटील,दादासाहेब लाड, उत्तम वरुटे, यावेळी आदि. मान्यवर उपस्थित होते.