कुंभोज/वार्ताहर
कुंभोज ता. हातकणंगले येथील पोस्ट ऑफिस परिसरात असणाऱ्या वसंत सोमा घोदे त्यांच्या घरात भाडे तत्वावर राहणाऱ्या विलास तातोबा कांबळे यांच्या घरात शॉर्टसर्किटने अचानक आग लागली. या आगीत घरातील प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले. तब्बल अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी अमोल शिंदे यांनी तात्काळ या घटनेची माहिती महावितरण कार्यालयाला कळवल्याने मोठी जीवितहाणी टळली. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. परिणामी यावेळी परिसरातील नागरिकांनी सदर आग आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. या घटनेचा पंचनामा गाव कामगार तलाठी संभाजी घाटगे व महावितरणच्या कर्मचार्यांनी केला आहे. या घटनेची माहिती मिळताच कुंभोज ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी घटनास्थळाला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.