प्रतिनिधी/ कुडचडे
कुडचडे येथील ‘मनी ट्रान्सफर’चा व्यवसाय करणाऱया ‘मनिग्राम’च्या कार्यालयात परत एकदा चोरी करण्यात आली असून सोमवारी रात्री उशिरा हा प्रकार घडल्याची माहिती कुडचडे पोलीस स्थानकातून प्राप्त झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरांनी मनिग्राम कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचे टाळे तोडून कार्यालयातील संगणकाचे दोन मॉनिटर व एक जिओ राऊटर लंपास केला. तसेच बाजूला असलेल्या एका बार अँड रेस्टॉरटंचे टाळे तोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण ते शक्य न झाल्यामुळे खिडकीची तावदाने फोडून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. पण आतल्या बाजूला लोखंडी खिडकी असल्याने आत जाण्यात चोरांना यश मिळाले नाही. तसेच त्यांच्याकडून बाजूच्या एका दुकानाचे टाळेही तोडण्यात आल्याचे दिसून आले आहे.
मनिग्राम केंद्रातील चोरीची तक्रार माड-बाणसाय येथील कार्यालयात मॅनेजर म्हणून काम पाहणाऱया रंजन नाईक यांनी केली आहे. सदर घटनेचा पंचनामा निरीक्षक रवींद्र देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सीताराम मळीक यांनी केला. यावेळी श्वानपथकाला तसेच ठसेतज्ञांना आणून तपास मार्गी लावण्यात आला. दरम्यान, सदर मनिग्राम केंद्रात गेल्या वर्षी 22 फेब्रुवारी रोजी अशाच प्रकारे अज्ञातांनी चोरी करून रोकड लंपास केली होती तसेच कार्यालयातील संगणकाची हार्ड डिस्क जाळून टाकली होती. सदर घटनेतील आरोपी अजून गजाआड झालेले नसून आता अवघ्या 10 महिन्यांच्या कालावधीत परत एकदा याच केंद्रात चोरी झालेली आहे. भर बाजारात पोलिसांची गस्त राहत असताना सुद्धा ही चोरी झाल्याबद्दल लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच बाजारातील गस्त वाढविण्याची मागणी दुकानदारांकडून होत आहे.