मुख्याधिकारी अजय गावडे यांची माहिती
कुडचडे / प्रतिनिधी
कुडचडे-काकोडाचे नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर यांच्या विरुध्द अविश्वास ठरावाची नोटिस दिली होती, ती वैध नसल्याने पालिका प्रशासनाच्या संचालकांनी फेटाळून लावल्याची माहिती कुडचडे पालिकेचे मुख्याधिकारी अजय गावडे यांनी दिली आहे.
पालिकेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीवेळचा प्रकार अयोग्य होता. मंत्री नीलेश काब्राल स्वतः त्या निवडणुकीच्या ठिकाणी उपस्थित राहिले होते. नंतर निवडणूक अधिकाऱयांनी मतदान घेतले. मंत्री काब्राल यांनी नगराध्यक्षपदासाठी उतरविलेला उमेदवार विश्वास सावंत यांना सात तर त्यांच्या विरोधातील बाळकृष्ण होडारकर यांना आठ मते प्राप्त होऊन त्यांचा विजय झाला होता.
तासारभरात दिली अविश्वास ठरावाची नोटीस
मात्र हा विजय काब्राल यांच्या पचनी पडला नव्हता. या निवडणुकीला येताना काब्राल ज्या दहा नगरसेवकांना घेऊन पालिकेत आले होते, त्यांना निवडणुकीनंतर परत आपल्या सोबत घेऊन आपल्या कार्यालयात गेले. तेथे त्यांची बैठक घेतली. एका तासापूर्वी निवडून आलेले नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर यांच्या विरुध्द अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेण्यात आला. तशी नोटीस पालिका प्रशासनालयाला सादर करण्यात आली.
काल सोमवारी पालिका प्रशासनाचे संचालक गुरूदास पिळर्णकर यांनी सदर अविश्वास ठरावाची नोटिस फेटाळून लावली. पुढच्या निर्णयापर्यंत बाळकृष्ण होडारकर हे नगराध्यक्षपदी राहणार आहेत.