प्रशासनाकडून सीलडाऊनची कडक अंमलबजावणी : वाढती रुग्णसंख्या चिंताजनक
वार्ताहर/ कुडची
कुडचीत एकाच दिवशी 7 कोरोनाबाधितांची भर पडताना आकडा 17 वर पोहचला आहे. कुडची हॉटस्पॉट असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे येथे अधिकाऱयांनी दक्षता घेत सीलडाऊनची अंमलबजावणी कडकच केली आहे. यामुळे किराणा दुकानांसह मेडिकल दुकानेही बंद ठेवताना बंदोबस्त कडक ठेवला आहे.
दरम्यान पोलिसांनीही गल्लोगल्ली बंदोबस्त ठेवताना सीलडाऊनची अंमलबजावणी कडक केली आहे. कुडचीला मिळणाऱया आठ ते नऊ संपर्क रस्त्यांवर नाकाबंदी करताना मार्ग बंद ठेवले आहेत. कुडची आणि नजीकच्या ग्रामीण भागाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. योग्य खबरदारी व दक्षता जिल्हा व तालुका प्रशासनाने घेतली आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची यादी करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. याबरोबरच नागरिकांनाही दक्ष राहण्याचे आवाहन करताना नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
क्वारंटाईनना ठेवण्यास कुडची, चिंचलीत विरोध
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्मयातील क्वारंटाईन लोकांची संख्या वाढत आहे. त्यांच्या व्यवस्थेसाठी अधिकारी गेले असता कुडची व मायाक्का चिंचली येथे आज (ता. 17) विरोध करण्यात आला.
कुडची येथील जमखंडी रोडवर असलेल्या लॉजवर क्वारंटाईन लोकांची सोय करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच नागरिकांनी विरोध केला. कुडची बसस्थानकानजीक असलेल्या लॉजवर क्वारंटाईनना ठेवण्यास विरोध करत नागरिक रस्त्यावर उतरले होते. कोरोनाची धास्ती नागरिकांनी घेतली आहे. त्यामुळे नागरी वसाहतीत त्यांना ठेवण्यास विरोध होत आहे. मायाक्का चिंचली येथील धर्मशाळेत क्वारंटाईनची सोय करण्यासाठी तहसीलदार चंद्रकांत बजंत्री व अधिकारी गेले होते. पण धास्तावलेल्या नागरिकांनी येथे क्वारंटाईनना ठेवण्यास विरोध केला. त्यामुळे अधिकारी तेथून माघारी परतले.