काकती पोलिसांच्या मध्यस्थीनंतर ग्रा. पं.चे खोलले टाळे
वार्ताहर /कुद्रेमनी
ग्राम पंचायतीच्या पदाधिकाऱयांना एका महिलेने शिविगाळ केल्याच्या मुद्यावरून कुद्रेमनी ग्राम पंचायतीला बुधवारी टाळे ठोकून पंचायत सदस्यांनी निषेध व्यक्त केला. बुधवारी सामोपचाराने वाद मिटविण्यासाठी काकती पोलिसांकडून प्रयत्न झाले. यानंतर पंचायतीचे टाळे काढण्यात आले.
सोमवारी एका महिलेने ग्रा. पं. च्या पदाधिकाऱयांना शिविगाळ केली म्हणून याबाबतची तक्रार ग्रामपंचायतीने काकती पोलीस ठाण्याकडे केली होती. याचा निर्णय लागेपर्यंत पंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा पंचायत सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या निर्णयानुसार बुधवारी पंचायतीला टाळे ठोकण्यात आले होते. याची माहिती मिळताच काकती पोलीस ठाण्याचे पीएसआय घटनास्थळी दाखल झाले. यानंतर सामोपचाराने हा वाद मिटविण्यासाठी प्रयत्न झाला. त्यानंतर टाळे लावून बंद केलेले पंचायतीचे दरवाजे उघडून दैनंदिन कामकाजासाठी खुले करण्यात आले.
यावेळी बीजेपी बेळगाव ग्रामीणचे माजी अध्यक्ष विनय कदम, नारायण झंगरुचे, ग्रा. पं. अध्यक्षा रेणुका रा. नाईक, उपाध्यक्ष विनायक ना. पाटील, सदस्य संजय पाटील, सदस्य शांताराम पाटील, सदस्य शिवाजी मुरकुटे, सदस्य अरुण देवण, सदस्या विमल साखरे, सदस्या आरती लोहार, सदस्या लता शिवणगेकर, मल्लव्वा कांबळे आदींसह शंकर पाटील, संदीप पाटील, रवळू देवण, निळकंठ साखरे व ग्रामस्थ उपस्थित होते.