बेंगळूर/प्रतिनिधी
देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा (former prime minister hd deve gowda) यांची कर्नाटकात स्वबळावर जेडीएस सरकार स्थापणे हीच अखेरची इच्छा आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि देवेगौडा यांचे पुत्र एच. डी. कुमारस्वामी (former cm hd kumaraswamy) यांनी पित्याची ही भावना बोलून दाखविली आहे.
जेडीएसने आगामी २०२३ विधानसभा निवडणूक (assembly election) जिंकण्यासाठी कम्बर कसली आहे. यासाठी जेडीएसने जनता पर्व १.० या नावाचा उपक्रम सुरु केला आहे. त्यात कार्यकर्त्यांची प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात. या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ झाला. २०२३ मध्ये कर्नाटक विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यात १२३ जागा जिंकण्याचे लक्ष्य जेडीएसने ठेवले आहे.
कुमारस्वामी आपल्या भाषणात म्हणाले की, आपले कुठे चुकले आणि पुढे वाटचाल करण्यासाठी काय करण्याची गरज आहे यावर आपण सारे लक्ष केंद्रित करूयात. जेडीएसचे स्वतंत्र सरकार सत्तेवर आणण्याची देवेगौडा यांची अखेरची इच्छा आहे. त्यासाठी मी उपक्रमांची आखणी करतो आहे. मला तुमचे सहकार्य हवे आहे. तुम्ही कसून मेहनत करावी अशी माझी अपेक्षा आहे. त्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेली सर्व ताकद आम्ही देऊ.