ऑनलाईन टीम / कुवैत सिटी :
कुवैतचे राजे शेख सबाह अल अहमद अल सबाह यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. राजेशाहीतील मंत्री शेख अली जेराह अल सबाह यांनी स्थानिक सरकारी न्यूज चॅनेलवर एका संक्षिप्त निवेदनाद्वारे राजे सबाह यांच्या निधनाचे वृत्त जाहीर केले.
2006 मध्ये सबाह यांनी कुवैतच्या राजघराण्याची सूत्रे हाती घेतली होती. शेख सबाह यांनी नेहमीच आधुनिकीकरणाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी अन्य राजघराण्यांशीही वैयक्तिक पातळीवर सलोख्याचे संबंध ठेवले. तसेच अमेरिकेबरोबर नेहमीच मैत्रीचे संबंधही त्यांनी कायम ठेवले होते. कतार आणि अन्य अरब देशांमधील वाद मिटवण्यासाठी मुत्सदेगिरीचा त्यांनी नेहमीच पाठपुरावा केला.
2011 मध्ये अरब देशांतील आंदोलने आणि तेलाच्या किंमतींमध्ये होणारे चढउतार यामुळे कुवैतच्या अर्थकारणाला अनुदानाद्वारे हातभार लावण्याचे काम सबाह यांनी केले. राजे सबाह यांचे सावत्र बंधू शेख नवाफ अल अहमद अल सबाह हे राजघराण्याचे उत्तराधिकारी असतील, असे सांगण्यात येते.