डब्ल्यूएचओचा उपक्रम; सासाकावा-इंडिया लेप्रसी फौंडेशनकडून जिल्हय़ातील 14 गावात जनजागृती
प्रतिनिधी / कोल्हापूर
जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओच्या वतीने जगभरात कुष्ठरोगाविषयी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. ‘कुष्ठरोग विसरू नका’ या टॅगलाईनखाली कोल्हापूर जिल्हय़ातील 15 गावात जनजागृती करण्यात आली. सांगली जिल्हय़ातही जागृती करण्यात आली.
जगातून कुष्ठरोगाला हद्दपार करण्यासाठी डब्ल्यएचओने जागतिक स्तरावर व्यापक जनजागृती सुरू केली आहे. कुष्ठरोगाचे रूग्ण सापडलेल्या जिल्हय़ात, तालुक्यात, गावात, भागांवर या मोहिमेत विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. भारतातील अशा ठिकाणी सासाकावा-इंडिया लेप्रसी फौंडेशनच्यावतीने कुष्ठरोग झालेल्यांची किंवा त्यातून बरे झालेल्यांची तपासणी केली जाते. तसेच आरोग्य विषयक माहिती देऊन कुष्ठरोग टाळण्यासाठी, रोखण्यासाठी प्रबोधनही केले जाते.
यासाठी ग्रामपंचायतींबरोबर बैठका, कुष्ठरोगाचा रूग्ण ओळखण्यासाठी जिल्हा कुष्ठरोग अधिकारी कार्यालयाचा स्टाफ, आशा वर्कर्स यांची मदत घेण्यात येते. केस ओळखल्यानंतर उपचार व पुनर्वसन याबाबतही मार्गदर्शन केले जाते. कोरोनाच्या महामारीनंतर आता कुष्ठरोगाचे आव्हान आहे. ते रोखण्यासाठी ही जनजागृती मोहीम राबविण्यात येत असल्याचे सासाकावा-इंडिया लेप्रसी फाउंडेशनचे सद्भभावना दूत योहेई सासाकावा यांनी सांगितले.
कोरोनाच्या काळात कुष्ठरोग्यांना फटका
कोरोना साथीच्या रोगाचा प्रभाव विशेषतः कुष्ठरोगाने बाधित लोकांवर आणि त्यांच्या कुटुंबांवर सर्वाधिक झाला. लॉकडाऊनच्या काळात वैद्यकीय सेवा मिळणे कठीण बनले होते. आर्थिक नुकसानीलाही त्यांना सामोरे जावे लागले आहे, अशी माहिती सासाकावा-इंडिया लेप्रसीच्या फौंडेशनच्या निरीक्षणातून पुढे आली आहे.