पाईपलाईन रोडवरील कूपनलिका दुरुस्तीकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील नागरिकांना सुरळीत आणि मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा मंडळाने ठिकठिकाणी कूपनलिका खोदाई केल्या आहेत. पण या कूपनलिकांची दुरुस्ती वेळेवर करण्याकडे एल अँड टी कंपनीचे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या असून विजयनगर पाईपलाइन रोड येथे धन्वंतरी कॉलनी येथील कूपनलिकेची दुरवस्था झाली आहे. याकडे अधिकारी लक्ष देतील का? अशी विचारणा होत आहे.
सध्या शहरात चोवीस तास पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र ही कामे करताना नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
राकसकोप जलाशयातील पाणीसाठा कमी झाल्यानंतर शहरात पाणी समस्या निर्माण झाली होती. शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे पर्यायी योजना म्हणून महापालिका प्रशासनाने कूपनलिकांची खोदाई केली होती. तसेच मोडकळीस आलेल्या विहिरिंचे पुनरुज्जीवन करण्याची योजना तत्कालीन शहर अभियंता आर.एस.नाईक यांनी राबविली होती. यासाठी त्यांनी बरेच परिश्रम घेतले होते. कूपनलिका आणि विहिरिंच्या पाण्याचा पुरवठा शहरवासियांना केला जातो. पण सध्या कूपनलिकांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पाईपलाईन रोड विजयनगर, धन्वंतरी कॉलनी परिसरात कूपनलिका खोदण्यात आली होती. पण कूपनलिकेच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ही कूपनलिका भुईसपाट झाली आहे. पाण्याच्या स्त्राsतांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. अडचणीच्या वेळी उपयोगी पडणाऱया कूपनलिकांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.