प्रतिनिधी/ बेंगळूर
ज्येष्ठ कृषीतज्ञ आणि जेएसएस विद्यापीठाच्या ग्रामविकास विभागाचे संचालक डॉ. एम. महादेवप्पा (वय 84) यांचे शनिवारी बेंगळूरमधील चंद्रा लेआऊट येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. दुपारी त्यांचे पार्थिव चंद्र लेआऊट येथील पाईनवूड अपार्टमेंटमधील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. सायंकाळी उशिरा त्यांचे मुळ गाव मादापूर (जिल्हा चामराजनगर) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
कृषी वैज्ञानिक म्हणून डॉ. एम. महादेवप्पा यांनी वैज्ञानिक निवड समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले होते. धारवाडच्या कृषी विद्यापीठाचे निवासी कुलगुरु म्हणूनही त्यांनी सेवा बजावली होती. कृषी क्षेत्रातील संशोधनाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. 1981 मध्ये हुकर पुरस्कार, 1984 मध्ये कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार, 1999 मध्ये भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या स्मारक पुरस्कार यासह अनेक पुरस्काराचे ते मानकरी ठरले होते.
डू. महादेवप्पा यांनी रेशीम विज्ञान राष्ट्रीय अकादमी, भारतीय विज्ञान लेखक संस्था यासह अनेक प्रतिष्ठित राष्ट्रीय संस्थांकडून पुरस्कार आणि फेलोशिप मिळविली होती. त्यांच्या निधनाबद्दल विविध संस्था आणि राजकीय मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.