बाजार समितीला शासनाचा लेखी आदेश : कोरोना संसर्गाचे सर्व नियम पाळून व्यवहार करण्याचे आवाहन : किरकोळ विक्रीला पूर्णपणे मनाई
वार्ताहर / कंग्राळी खुर्द
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारपासून भाजी मार्केट सुरू करण्याची परवानगी शासनातर्फे देण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीला लेखी आदेश दिला असल्याची माहिती माजी चेअरमन निंगाप्पा जाधव यांनी दिली. यावेळी कोरोना संसर्गाचे सर्व नियम पाळून व्यवहार करण्यात येणार आहेत. संसर्गजन्य रोग असल्याने गर्दी टाळणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरची सक्ती करण्यात येणार आहे.
कर्नाटकासह बेळगाव जिल्हय़ामध्ये कोरोनाच्या दुसऱया लाटेने हाहाकार माजविला होता. यासाठी प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मार्केट कणबर्गी येथील गायरान, ऑटोनगर परिसर आणि ज्योती कॉलेजनजीकच्या सीपीएड मैदानावर तात्पुरते दुकान गाळे बांधून सुरू करण्यात आले होते. मात्र त्या ठिकाणी भाजी खरेदी-विक्री करण्यासाठी ज्या सोयीसुविधा लागतात त्या पुरविण्यात आल्या नव्हत्या. त्यातच पावसामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे या ठिकाणी व्यवहार करण्यासाठी व्यापारी वर्गासह शेतकरी बांधवांनी असमर्थता दर्शविली होती. यासंदर्भात व्यापारी वर्गाने बाजार समिती प्रशासनाला प्रत्यक्ष भेटून बाजार समिती आवारात भाजी मार्केट पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती.
जिल्हाधिकारी व्यापारी वर्गाची भेट
यासंदर्भात बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन युवराज कदम यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनातर्फे उपसचिव दिपा पाटील, एम. पी. पाटील, सुनील गोडबोले, संजू माळवादे यांच्यासह व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष बसवनगौडा पाटील, सतिश पाटील यांनी जिल्हाधिकारी हिरेमठ यांची भेट घेतली आणि भाजी मार्केटमध्ये अपुऱया सुविधा आणि पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरल्यामुळे व्यापार करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे व्यापारी आणि विशेष करून शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱयांनी कोरोना संसर्ग नियमांचे पालन करत व्यवहार करण्याचे सांगितले.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी भाजी मार्केट पूर्ववत करण्यासाठी व्यापारी आणि बाजार समिती कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थांनी चेअरमन युवराज कदम होते. यावेळी माजी चेअरमन निंगाप्पा जाधव, व्यापारी प्रतिनिधी महेश कुगजी, आर. के. पाटील, मनोज मत्तीकोप यांच्यासह व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष बसवनगौडा पाटील, सतिश पाटील, मोहन मन्नोळकर, दिवाकर, ए. के. बागवान, एम. एम. डोणी, विनोद राजगोळ, राजू बेळगावकर, दत्ता कुंडेकर, जावेद सनदीसह वनराशी, बाळू भोसले यांच्यासह व्यापारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
परवाना धारकांना व्यापार करण्याची अनुमती
भाजी मार्केट व्यापारी बांधवांनी बाजार समितीकडून कृषी परवाना घेतला आहे. त्यांना दुकाने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिवाय मार्केटसाठी दुकानगाळे बांधण्यात आले आहेत. त्या ठिकाणी सुद्धा व्यवहार करण्यासाठी व्यापारी वर्गाला अनुमती देण्यात आली आहे.
गाडय़ा पार्किंगची व्यवस्था
भाजी व्यवहार परिसरात वाहने थांबविल्यास 1000 रु. दंड आकारण्याचे ठरविण्यात आले आहे. शिवाय दुचाकी किंवा इतर वाहने बाजार समिती प्रवेशद्वाराच्या उत्तरेकडे खतांच्या दुकानसमोरील रस्त्यावर पार्क करण्याचे आदेश दिले
आहेत.
तेजी- मंदी व्यवहार संडे मार्केट परिसर
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होलसेल भाजी घेऊन पुन्हा तेजी-मंदी काही व्यापारी करत असतात. त्यांनी मुख्य भाजी मार्केट परिसरात व्यवहार न करता ज्या व्यापारी आणि शेतकरी बांधवांना थेट ग्राहकांना विक्री करावयाची असल्यास त्यांच्यासाठी समिती कार्यालयाच्या मागील बाजूस संडे मार्केट आणि इतर इमारती आहेत. त्या ठिकाणी व्यवहार करावयाची व्यवस्था करण्यात आली आहे.
किरकोळ विक्री पूर्णपणे बंद
भाजी मार्केट परिसर किंवा बाजार समिती आवारामध्ये किरकोळ भाजी विक्री पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. ज्यांना किरकोळ विक्री करावयाची आहे त्यांनी बाहेर कोठेही किरकोळ विक्री करावी.
किरकोळ विक्रीमुळे मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे किरकोळ भाजी खरेदीसाठी बाजार समिती आवारामध्ये नागरिकांनी येऊ नये, असे आवाहन बाजार समिती प्रशासनातर्फे करण्यात आले
आहे.