बार्शी / प्रतिनिधी :
आमदार राजेंद्र राऊत यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी यांच्यावतीने शेतीपूरक उद्योग व्यवसायाला चालना मिळावी, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसायाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाच्या बाजूस 1 कोटी 63 लाख रुपये किंमतीचे, 23 गाळ्यांचे शॉपिंग सेंटरचे भूमिपूजन बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत, व्हा.चेअरमन झुंबर जाधव, संचालक रावसाहेब मनगिरे मालक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
नेहमी उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी अग्रेसर असणारे आमदार राजेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली व संकल्पनेतून बार्शी नगरपरिषद म मार्फतही बार्शी शहरात 900 व्यापारी गाळे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी जवळपास 300 गाळे हे बांधून तयार झालेले असून, उर्वरित गाळ्यांचे काम व नियोजित आराखडा प्रगतिपथावर आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी व्यवसाय करणे करीता हे व्यापारी गाळे उपलब्ध होत आहेत. नोकरीच्या मागे न लागता तरूणांनी उद्योग व्यवसायात पुढे यावे व आर्थिक प्रगती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.
आमदार राजेंद्र राऊत यांच्या या संकल्पनेतून व दृष्टिकोनातूनच बाजार समितीच्या मार्फत शेती पूरक व्यवसायासाठी नवीन 23 व्यापारी गाळ्यांचे भूमिपूजन करण्यात आले. लवकरच या ठिकाणी तरुणांसाठी व्यवसायाची संधी उपलब्ध होईल. या भुमिपुजन समारंभास संचालक बापूसाहेब शेळके, वासुदेव बापू गायकवाड, पिंटू घोडके, रामेश्वर मांजरे, सचिव तुकाराम जगदाळे, दामोदर काळदाते, नवनाथ गपाट,सुभाष साखरे, सचिन मडके, तुकिराम माने आदी उपस्थित होते.