प्रतिनिधी/ कराड
रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची पूर्वप्रक्रिया सुरू झाली आहे. सहकारी निवडणूक प्राधिकरणकडून शुक्रवारी कारखान्याच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था प्रकाश आष्टीकर यांची नियुक्ती केली. तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कराडचे उपनिबंधक मनोहर माळी यांच्यासह तीन अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, 26 जूनला कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान होण्याची शक्यता आहे.
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम झाली असून 47 हजार 160 मतदार आहेत. मतदार यादी अंतिम झाल्याच्या तारखेपासून 10 दिवसानंतर व 20 दिवसांच्या आत कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम कायद्यानुसार जाहीर होणार आहे. त्यानुसार 15 ते 25 मे दरम्यान कधीही निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी सहकारी निवडणूक प्राधिकरणकडून कारखान्याच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टीकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून कराडचे उपनिबंधक मनोहर माळी यांच्यासह तीन अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे आदेश आज देण्यात आले आहेत. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम तयार करून त्यास निवडणूक प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. त्यानंतर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान 26 जूनला कारखाना निवडणुकीसाठी मतदान, 28 जूनला मतमोजणी तर अर्ज दाखल करण्याची मुदत 19 ते 25 मे, 12 जून अर्ज माघार असा कार्यक्रम संभाव्य कार्यक्रम राज्य प्राधिकरणकडे पाठवण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर अधिकृत घोषणा होईल.