35 जणांची अतिक्रमण हटवली
प्रतिनिधी/ सातारा
सातारच्या मेडिकल कॉलेजची जागा ही कृष्णा खोरे विभागाची होती. त्या जागेत तब्बल चाळीस वर्षांपासून 35 कुटुंबे रहात होती. तर काहीजण पाटबंधारे विभागाच्या गाळ्यात अनधिकृतपणे रहात होते. त्यांना नोटीस देऊनही ते ती जागा सोडत नव्हते. शेवटी महाविद्यालयाच्या इमारतीचे काम सुरु करावयाचे असल्याने मंगळवारी पोलीस प्रशासन व कार्यकारी अभियंता धोम कालवे विभाग क्रं 2 यांनी संयुक्तरित्या अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवला. या कारवाईमुळे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
येथील कृष्णानगर येथील कृष्णा खोरे विकास महामंडळाची प्रशस्त अशी जागा आहे. त्या जागेपैकी 62.6 एकर क्षेत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या नावे सुमारे हस्तांतरीत झाले आहे. याच जागेत तब्बल चाळीस वर्षांपासून काही मंडळी राहत आहेत तर काही मंडळी गाळे वापरत होते. हे गाळे ठराविक वर्षांकरता भाडय़ाने दिल्याचे समजते. करार संपल्यावरही गाळे धारकांनी त्याच गाळ्यात आपला व्यवसाय सुरूच ठेवला होता. काहीजणांनी तर कृष्णा खोरेच्या जागे घरे ही बांधली होती. संबंधिताना पाटबंधारे विभागाने चार महिन्यांपूर्वी जागा खाली करण्याच्या नोटीसा बजावल्या होत्या. मात्र, नोटिसा देऊन ही कोणतीही हालचाल झाली नसल्याने मंगळवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली.
मोहिमेदरम्यान वादविवाद
अतिक्रमण हटाव मोहिम कृष्णा खोरे विकास महामंडळाचे धोम विभागाचे अभियंता विकास पाटील हे पूर्ण तयारीत आले होते. जेसीबी, बुलडोझरसह मोठा पोलीस फाटा घेऊन सकाळी 7 वाजताच अतिक्रमण काढायला आले. त्यावेळी त्यांच्या आदेशानुसार जेसीबी अतिक्रमण केलेल्या घराच्या दिशेने जात होता. घरे पडत होती. वादविवाद होत होते. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण होत होते.
डीवायएसपी आंचल दलाल ऑन दि स्पॉट
तणावाची परिस्थिती जेव्हा जेव्हा निर्माण होते तेव्हा तेव्हा पोलीस कर्मचाऱयांना आदेश देण्यासाठी ऑन द फिल्ड अधिकारी असणे गरजेचे असते. जेव्हा सातारच्या ग्रेड सेपरेटरच्या पुलाच्या नामफलक फाटल्याने वाद चिघळल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा स्वतः डीवायएसपी आंचल दलाल या होत्या. आताही वादविवाद होऊ नये, म्हणून स्वतः त्या व सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्यासह 250 पोलीस कर्मचारी तैनात होते.
जागेचा सातबारा वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावे
या जागेचा सात बारा उतारा वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावावर झाला असून, लवकर या ठिकाणी महाविद्यालयाच्या इमारतीचे आराखडय़ानुसार बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. वसाहतीमधील येथील जागेत सुमारे 40 ते 45 वर्षापूर्वीचे दुकान गाळे आहेत. येथील दुकान गाळे खाली करण्यासाठी धोम कालवे विभाग क्र 2 ने संबंधित व्यापाऱयांना नोटीस दिल्या होत्या. परंतु व्यापाऱयांनी पर्यायी जागेची मागणी करून दुकान गाळे खाली करण्यास नकार दिला होता. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
कोणाच्या कृपेने अतिक्रमणे ?
काही लोकप्रतिनिधीच्या नावाचा गैरवापर करून चुकीची कामे सातारा शहरांत होत असतात. त्यापैकी हे एक असून ज्यांनी लोकप्रतिनिधीकडे मागणी केली आहे त्यांना कोणाचा वरदहस्त होता, अशी चर्चा सुरू होती. दरम्यान, अतिक्रमणे हटवल्याने अनेकांचे संसार उददवस्त झाले असले तरी मेडिकल महाविद्यालयाच्या इमारतीच्या कामासाठी हे घडणारच होते. त्यामुळे ही कारवाई अटळ होती. थरीही ज्यांची अतिक्रमणे निघाली त्या कुटुंबांचा आक्रोश विदारक होता.