वार्ताहर/ कराड
कराड व पाटण तालुक्यातील कोरोनाबाधितांवर कराडच्या कृष्णा व सहय़ाद्री हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. मात्र दोन-तीन दिवसांपासून कराड, पाटण तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ झाल्याने कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी शारदा क्लिनिक एरम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोरोनाविरूद्धच्या लढाईत मैदानात उतरले आहे. एरम हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधितांसाठी स्वतंत्र वॉर्ड, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे. सध्या या ठिकाणी चार कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात येत आहेत.
कराड तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर प्रशासन व आरोग्य विभागाने तालुक्यात पार्ले, फार्मसी, इंजिनिअरिंग कॉलेज, वाठार व विजयनगर या ठिकाणी कोरोना केअर सेंटर सुरू केली आहेत. उपजिल्हा रुग्णालयात कोरोना हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले होते. मात्र काही दिवसानंतर उपजिल्हा रुग्णायातील कोरोना बाधितांवरील उपचार बंद करून त्या ठिकाणी केवळ नियमित रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. कृष्णा हॉस्पिटलला कोरोना हॉस्पिटलचा दर्जा देण्यात आल्याने कराड व पाटण तालुक्यातील रुग्ण कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात येत होते. मात्र रुग्णांची संख्या वाढल्याने व उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना बाधितांवरील उपचार बंद केल्याने सहय़ाद्री हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार सुरू करण्यात आले.
कृष्णा रुग्णालयात एकूण 100 कोरोनाबाधितांसाठी बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या येथे 108 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. तर सहय़ाद्री हॉस्पिटल येथे 40 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी 29 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. तर सहय़ाद्रीमध्ये आयसीयूच्या पाच बेडची सोय करण्यात आली आहे. तीन दिवसांपासून कराड व पाटण तालुक्यातील रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढल्याने कृष्णा व सहय़ाद्रीतील कोरोनाबाधितांची बेड फुल होत आल्याने एरम हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
एरम हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र वॉर्ड व डॉक्टर
एरम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे कराड शहरातील नामांकित हॉस्पिटल आहे. शहरासह तालुक्यातील मोठय़ा संख्येने रुग्ण एरम हॉस्पिटलमध्ये येत असतात. अशावेळी कोरोना रुग्णांमुळे नियमित रुग्णांच्या उपचार व सेवेवर परिणाम होऊ नये यासाठी एरम हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधितांसाठी 28 बेडचा स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. कोरोना वॉर्डसाठी 8 डॉक्टर, एक फिजिशिएन व आरोग्य कर्मचाऱयांच्या स्वतंत्र टीमची नेमणूक करण्यात आली आहे. कोरोनाबाधित व नियमित रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर व वॉर्ड स्वतंत्र असल्याने नियमित रुग्णांवरील उपचार अखंड सुरू राहणार असल्याची माहिती डॉ. चिन्मय एरम यांनी दिली.
कराड 356 तर पाटण तालुक्यात 120 रुग्ण संख्या
कराड तालुक्यात शनिवारी दुपारपर्यंत 356 कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे. यातील 223 जण कोरानामुक्त झाले असून 6 कोरानाबाधितांचा मृत्यू झाला आहे. पाटण तालुक्यात 120 कोरोनाबाधितांची संख्या झाली असून 70 जण कोरोना मुक्त झाले आहेत, तर 6 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.