‘ई-छावणी’ प्रणाली सुरू करण्याचा प्रस्ताव
प्रतिनिधी/ बेळगाव
विविध सरकारी कार्यालयांतील कामकाज ऑनलाईन करून पेपरलेस कारभार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता कॅन्टोन्मेंट बोर्डनेही ‘ई-छावणी’ या नावाने ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. जनतेला या पोर्टलच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव आहे. ‘ई-छावणी’ ऑनलाईन सुविधेची अंमलबजावणी करण्याचा आदेश सदर्न कमांडने बजावला आहे. हा विषय कॅन्टोन्मेंट बोर्ड बैठकीच्या अजेंडय़ावर घेण्यात आला आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डची सर्वसाधारण सभा मंगळवार दि. 22 रोजी सकाळी 11 वा. आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या अजेंडय़ावर विविध विषय घेण्यात आले आहेत. प्रामुख्याने ‘ई-छावणी’ ऑनलाईन सुविधेची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. सध्या सर्वच कार्यालयात ऑनलाईन कामकाज सुरू आहे. महापालिकेत ऑनलाईन इमारत बांधकाम परवाना, कर भरणा तसेच विविध अर्ज ऑनलाईनद्वारा स्वीकारण्यात येत आहेत. त्या धर्तीवर आता कॅन्टोन्मेंट बोर्डचे कामकाजही ऑनलाईन होणार आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिकांना पुरविण्यात येणाऱया सर्व सुविधा संगणकीकृत करण्यात येणार आहेत. प्रत्येक कामासाठी नागरिकांना कार्यालयाच्या पायऱया झिजविण्याची गरज नाही. ऑनलाईन सुविधा उपलब्ध झाल्यास कॅन्टोन्मेंटवासियांना घरबसल्या विविध अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे या सुविधेची अंमलबजावणी करण्याची सूचना पुणे सदर्न कमांडने कॅन्टोन्मेंट बोर्डला केली आहे. त्याकरिता हा विषय कॅन्टोन्मेंट बोर्ड बैठकीच्या अजेंडय़ावर घेण्यात आला आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डचे ऑडिट करण्यात येते. एप्रिल 2017 ते सप्टेंबर 2018 या कालावधीतील लोकल ऑडिटर ऑफिर्सची ऑडिट फी भरण्यात आली नाही. सदर फी 5 लाख 57 हजार 668 रुपये आहे. सदर फी भरण्याकरिता पत्र आले असल्याने या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी अजेंडय़ावर घेण्यात आला आहे.
रामघाट रोड ते एमईएस ऑफीसपर्यंतच्या पोन्नाप्पा मार्ग एमईएसकडे हस्तांतर करण्याचा प्रस्ताव असून, सदर प्रस्ताव बैठकीच्या अजेंडय़ावर आहे. सदर रस्त्याची देखभाल कॅन्टोन्मेंट बोर्डच्यावतीने करण्यात येत होती. मात्र, हा रस्ता एमईएसकडे हस्तांतर करावा, अशी सूचना संरक्षण खात्याने कॅन्टोन्मेंट बोर्डला केली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी एमईएसकडे सोपविण्यात येणार आहे. रामघाट रोडपासून एमईएस कार्यालयापर्यंतच्या पोन्नाप्पा मार्गाची देखभाल करण्याची जबाबदारी कॅन्टोन्मेंटने मागे घेतली आहे. त्यामुळे यापुढे हा रस्ता एमईएसकडे हस्तांतर केला जाणार आहे.