वेळेत वेतन दिले नसल्याने कर्मचाऱयांचे आंदोलन
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. निधीविना विकासकामे आणि नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्याचे रखडले आहे. अलीकडे कर्मचाऱयांचे वेतन देण्यासाठीदेखील निधी नसल्याने दोन महिन्यांचे वेतन देण्यात आले नाही. यामुळे वेळेवर वेतन देण्यात यावे, या मागणीसाठी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कर्मचाऱयांनी कामबंद आंदोलन छेडून कार्यालयाला टाळे ठोकले.
केंद्र आणि राज्य शासनाकडून कॅन्टोन्मेंट बोर्डला निधी मंजूर करण्यात आला नाही. परिणामी विकासकामे राबविण्यासाठी निधी नाही. तसेच मागील वर्षभरापासून कर्मचाऱयांचे वेतन वेळेवर देण्यात येत नाही. जून आणि जुलै अशा दोन महिन्यांचे वेतन देण्यात आले नसल्याने कर्मचाऱयांची आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे. वेळेवर वेतन देण्यात यावे, या मागणीचे निवेदन सातत्याने देण्यात आले. पण याबाबत कार्यवाही करण्यात कॅन्टोन्मेंट प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे कर्मचाऱयांनी सोमवारी सकाळी कामबंद आंदोलन छेडून कार्यालयाला ठाळे ठोकले. परिणामी कॅन्टोन्मेंट कार्यालयातील कर्मचाऱयांनादेखील कार्यालयाबाहेर ताटकळत थांबावे लागले. कर्मचाऱयांनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडून वेतन वेळेवर देण्याची मागणी केली. आंदोलनात स्वच्छता कर्मचाऱयांसह सर्वच कर्मचाऱयांनी सहभाग घेतल्याने कॅन्टोन्मेंट कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले.
कर्मचाऱयांनी सहकार्य करावे -सीईओ आनंद के.
यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद के. यांना माहिती देण्यात आली. आनंद के. यांनी कर्मचाऱयांची भेट घेऊन चर्चा केली असता वेतन देण्याची मागणी करण्यात आली. दोन महिन्यांपासून वेतन दिले नसल्याने औषधोपचार व अन्य खर्च करण्यासाठी आर्थिक टंचाई भासत आहे. त्यामुळे वेळेवर वेतन देण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली. शासनाकडून वेतनाची रक्कम वेळेवर मिळत नसल्याने समस्या उद्भवत आहे. परिणामी कर्मचाऱयांना वेतन देण्यास विलंब होत आहे. आंदोलन छेडून समस्येचे निवारण होणार नाही. कर्मचाऱयांनी सहकार्य करावे, असे आवाहन आनंद के. यांनी केले.