सिडनी / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार, अष्टपैलू खेळाडू कॅमेरुन व्हॉईटने व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 37 वर्षीय व्हॉईट निवृत्तीनंतर प्रशिक्षणाकडे आपला मोर्चा वळवणार आहे. आपल्या 20 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्याने 4 कसोटी, 91 वनडे व 47 टी-20 सामने खेळले. याशिवाय, सातवेळा त्याने संघाच्या नेतृत्वाची धुराही सांभाळली.
‘मी यापुढे खेळणार नाही, हे निश्चित आहे. क्लब स्तरावर अद्याप माझा स्ट्रायकर्स संघाशी एका वर्षाचा करार बाकी आहे. गतवर्षी या संघातर्फे मला काही सामने खेळण्याची संधी मिळाली आणि त्यात प्रभावशाली खेळ साकारणे क्रमप्राप्तच होते’, असे व्हॉईट येथे म्हणाला. व्हॉईटने मागील हंगामात ऍडलेड स्ट्रायकर्स संघातर्फे 6 सामने खेळले. त्याच्या खात्यावर 10 प्रथमश्रेणी जेतेपदे, 6 शेफिल्ड शील्ड, प्रथमश्रेणी वनडे जेतेपद, दोन टी-20 जेतेपदे व एकदा बिगबॅश जेतेपदाचा समावेश आहे.