जुझे फिलीप डिसोझा यांची टीका
प्रतिनिधी /पणजी
म्हादईचे पाणी कर्नाटकाला देण्यासाठी दोन्ही राज्यांमध्ये बोलणी झाली असून त्यासाठी गोवा सरकारने मान्यता दिली आहे, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बेळगाव येथे झालेल्या सभेत करून गोवा सरकारचा भांडाफोड केला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी सांगितले. म्हादईचे पाणी वळवण्यास कर्नाटकाला देणार नाही. केंद्रीय नेते गोव्याचा मुद्दा उचलून धरणार असे गोवा सरकार लोकांना सांगत होते. मात्र गोवा सरकारचा खोटारडेपणा आता उघडा पडला आहे, असेही डिसोझा म्हणाले. मंगळवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत डिसोझा बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत अॅङ अविनाश भोसले व अन्य उपस्थित होते.
म्हादईचे पाणी गोव्याला फार महत्वाचे आहे. किंबहुना म्हादईवर गोवेकरांचे जीवन अवलंबून आहे, त्यासाठी आता लोकांनी लढा देणे गरजेचे आहे. कर्नाटकात विधानसभा निवडणूक होणार असून तेथील मतदारांना खूष करण्यासाठी भाजप गोमंतकीयांचे जीवन उद्ध्वस्त करू पाहत आहे. गोवेकरांच्या पाठीत खंजीर खूपसून गोवा सरकारने म्हदई कर्नाटकाला विकली आहे, असा आरोप डिसोझा यांनी केला आहे.
म्हादईसाठी आम्ही कोणत्याही व्यासपीठावर यायला तयार आहोत. म्हादईचा लढा जनता उभारणार असून त्यासाठी चाळीसही आमदारांनी रस्त्यावर यावे असे आव्हान त्यांनी सरकारला दिले आहे. सरकराने लोकांना फसविणे आता बंद करावे आणि ठोस कारवाई करावी. अन्यथा सगळे हातातून जाईल तेव्हा डोळे उघडतील तोपर्यंत गोव्याचे स्मशान होईल, असे डिसोझा म्हणाले.