पगारदारांना आयकर मर्यादा वाढीची आशा
प्रतिनिधी/ पणजी
आज सादर होणाऱया केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत गोव्यातील जनतेमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आयकरात केवढी सूट मिळेल, याबाबत पगारदार मंडळीची उत्सुकता ताणलेली आहे. उद्योजक मंडळी केंद्राकडून काही नव्या करसवलती मिळतील का? याच्या प्रतीक्षेत आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत भारताचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आज सादर होणाऱया अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सर्वांच्याच नजरा सीतारामन यांच्याकडे लागलेल्या आहेत. राज्यातील लाखोंच्या संख्येने असलेली पगारदार मंडळी आजच्या अर्थसंकल्पातून आयकरातील सूट वाढली जाईल काय या प्रतीक्षेत आहेत. आज सकाळी 11 वाजता लोकसभेत सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दोन वर्षांपूर्वी आयकरात जी सूट दिली होती त्यात कोणताही बदल झालेला नव्हता. त्यामुळे ही सूट आता किमान रु. 7 लाखपर्यंत जाईल काय, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
उद्योजक करसवलतींच्या प्रतिक्षेत
उद्योग क्षेत्रात गोव्यात निराशेचे चित्र आहे. जागतिक मंदीचे गंभीर परिणाम राज्यातील उद्योग व्यवसायावर झालेले आहेत. अनेक उद्योग व्यवसाय बंद पडत आहेत. राज्यात आता केवळ पर्यटन उद्योग तेजीत आहे. मंदीचे परिणाम तथा झळ या उद्योग क्षेत्रालाही बसलेली आहे. अशावेळी उद्योगांसाठी नव्याने काही कर सवलती तसेच निर्यातीला प्राधान्य देण्यासाठी काही सवलती जाहीर केल्या जातील का याबाबत राज्यातील उद्योगपती प्रतीक्षेत आहेत.
करप्रणालीत राज्याला फारसे अधिकार नाहीत
काही सामाजिक योजनांचीही राष्ट्रीय पातळीवरून घोषणा अपेक्षित आहे. आज सादर होणाऱया या अर्थसंकल्पाबाबत जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. गोवा सरकारचा अर्थसंकल्प दि. 6 फेब्रुवारी रोजी मुख्यंमत्री डॉ. प्रमोद सावंत मांडणार आहेत. जीएसटी लागू असल्याने कर प्रणालीत दुरुस्ती करण्यास राज्यांना फारसे अधिकार राहिलेले नाहीत. केवळ मद्यार्क, करमणूक कर आणि पेट्रोलियम पदार्थांवरील कर निश्चित करण्याचे अधिकार राज्यांना राहिलेले आहेत. एकंदरीत या पार्श्वभूमीवर आज सादर होणाऱया अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.