महागाई भत्त्याचे प्रलंबित 3 हप्ते लवकरच मिळणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना संकटादरम्यान सरकारी कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांचा रोखण्यात आलेला महागाई भत्ता तसेच महागाई दिलासा (डीए आणि डीआर) यांचे तीन हप्ते लवकरच प्रदान करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांचे रोखण्यात आलेले तिन्ही हप्ते लवकरात लवकरच निर्णय घेत दिले जाणार असल्याचे अर्थमंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केले आहे. 1 जुलै 2021 पासून लागू होणाऱया दरांवर (इफेक्टिव्ह रेट्स) हप्त्यांची रक्कम देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
केंद्र सरकारने कोरोना संकटादरम्यान रोखण्यात आलेल्या महागाई भत्त्यांच्या हप्त्यांपासून 37,430.08 कोटी रुपयांची बचत केली, या निधीचा वापर महामारीला सामोरे जाण्यासाठी करण्यात आला. केंद्रीय कर्मचाऱयांचा महागाई भत्ता आणि निवृत्तिवेतनधारकांच्या डीआरच्या 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 च्या हप्त्यांना रोखण्यात आले आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱयांना 17 टक्के महागाई भत्ता देण्यात येत आहे. मंत्रिमंडळाने यात 4 टक्क्यांच्या वृद्धीला मंजुरी दिली असल्याने महागाई भत्ता 21 टक्के होणार असून तो 1 जुलैपासून लागू होणार असल्याचे अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले आहे.
एप्रिल 2020 मध्ये केंद्र सरकारचे 50 लाख कर्मचारी आणि 61 लाख निवृत्तिवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात जुलै 2021 पर्यंत कुठल्याही प्रकारच्या वृद्धीवर स्थगिती लावण्याचा निर्णय अर्थ मंत्रालयाने घेतला होता.