ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना प्रतिबंधक लसीची खरेदी केंद्रीय स्तरावर होणार आहे. त्यामुळे राज्यांनी स्वतंत्रपणे लस खरेदी करू नये, अशा सूचना राष्ट्रीय तज्ज्ञ गटाने सर्व राज्यांना केल्या आहेत.
निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय तज्ज्ञ गटाची बैठक झाली. या बैठकीत कोरोना लसीसाठी देशी उत्पादन क्षमतेचा पुरेपूर वापर कसा करता येईल. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर लस उत्पादक देशांशी समन्वय कसा साधता येईल, या दोन मुद्यांवर चर्चा झाली.
तसेच देशात सध्या चाचण्या सुरू असलेल्या लसींची निवड कशी करता येईल, लसीच्या कुपीचे वितरण, साठवण आणि लसीकरण कसे करता येईल, या दृष्टीने माहिती देण्यात आली. लसीकरणासंदर्भात राष्ट्रीय सल्लागार गटाच्या उपसमितीकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळे लसीची खरेदी आणि वितरण दोन्हीही केंद्रीय स्तरावर होईल, असे केंद्र सरकारच्या निवेदनात म्हटले आहे.