कार्यकर्त्यांसोबत ठरविणार निवडणूक रणनीती
प्रतिनिधी /पणजी
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज दि. 20 रोजी गोवा दौऱयावर येत आहेत. या भेटीत ते राज्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निवडणुकीची रणनीती आणि पक्ष बळकट करण्यासंबंधी मार्गदर्शन करणार आहेत.
आप सत्तेवर आली तर राज्यात 300 युनिट वीज पुरवठा मोफत आणि 24 तास अखंडित वीजपुरवठा करेल असे आश्वासन त्यांनी मागील गोवा भेटी दरम्यान दिले होते. या घोषणेनंतर गोव्यातील सत्ताधारी आणि विरोधकांच्याही पायाखालची वाळू घसरली होती. केजरीवाल यांच्या या घोषणेच्या काही दिवसांतच त्याच योजनांची नक्कल करणाऱया दोन योजना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही जाहीर केल्या. त्यातील एक म्हणजे विनामूल्य पाणी आणि दुसरी एक खिडकी सेवा योजना. मात्र या योजना अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यातच हरवणार नाही याची सरकारने दखल घ्यावी, असे आपने म्हटले आहे.
दरम्यान, केजरीवाल मॉडेलच्या भीतीतून काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांवर विविध राज्यांमध्ये आपले मुख्यमंत्री बदलण्याची पाळी आली आहे, अशी टीका आपचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी केली आहे.
केजरीवाल यांच्या घोषणांची नक्कल : म्हांबरे
गोवा सरकारने चालू केलेली ‘सरकार तुमच्या दारी’ ही योजनासुद्धा अरविंद केजरीवाल यांच्याच आणखी एका योजनेची नक्कल असल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला असून या योजनेची कार्यक्षमतेने अंमलबजावणी करावी, अशी विनंती केली आहे.
केजरीवाल यांनी गोमंतकीयांना मोफत वीज देण्याची घोषणा केल्यापासून डॉ. सावंत आपच्या प्रत्येक योजनेची नक्कल करत आहेत. खरे तर हाच आमचा खरा विजय आहे. असाप्रकारे अनुकरण करून तुम्ही आमच्या योजनेची अप्रत्यक्ष प्रशंसाच केली आहे. आपवर चिखलफेक करून मुख्यमंत्र्यांना आमच्या धोरणांची नक्कल करायला भाग पाडले जाते याचा आम्हाला आनंद आहे. मात्र केवळ नक्कल करून चालणार नाही तर त्याच्या अंमलबजावणीसाठीही त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावे, असा सल्ला आपने दिला आहे. काही दिवसांपूर्वीच प्रमोद सावंत यांनी मोफत पाणी योजनेचे घोषणा केली असली तरीही त्याबद्दल अनेकांना संशय आहे. भविष्यात वाढीव बिले दिली जातील, अशी भीतीही व्यक्त होत आहे. त्याचबरोबर गेली 4 वर्षे या योजना कुठे होत्या? असा सवाल संयोजक राहुल म्हांबरे यांनी उपस्थित केला आहे.