दिल्लीतील विधानसभा निवडणूक हा भारताचा अंतर्गत प्रश्न असून पाकिस्तानने त्यात ढवळाढवळ करू नये, असा इशारा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाकिस्तानला दिला आहे. पाकिस्तान हा दहशतवादाचा सर्वात मोठा पुरस्कर्ता असून पाकिस्तानने भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये लक्ष घालून स्वतःचे महत्त्व वाढविण्याचे प्रयत्न करू नयेत, असेही त्यांनी ठणकावले.
पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री फवाद हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात केजरीवालांचे समर्थन करणारा ट्विटर संदेश प्रसारित केला होता. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना केजरीवाल यांनी मोदी आपलेही पंतप्रधान आहेत, असे सांगितले. पाकने भारतात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये. तो यशस्वी होणार नाही, असेही प्रत्युत्तर केजरीवाल यांनी दिले आहे.