वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला रेस वॉकर केटी इरफान व अन्य चार ट्रक अँड फील्डचे ऍथलेट्स दुसऱयांदा घेण्यात आलेल्या कोव्हिड 19 चाचणीत निगेटिव्ह आढळले आहेत. बेंगळूरमधील साई केंद्रात त्यांची ही चाचणी घेण्यात आल्याचे साईने शुक्रवारी सांगितले.
7 मे रोजी घेण्यात आलेल्या साप्ताहिक चाचणीत इरफानसह एकूण पाच ऍथलेट्स पॉझिटिव्ह आढळले होते. पण दुसऱया चाचणीत साईने शुक्रवारी या सर्व ऍथलेट्सचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे या सर्व खेळाडूंनी 29 एप्रिल रोजी व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला होता. एकूण 22 खेळाडूंची चाचणी घेण्यात आली, त्यातील फक्त एकजण अजूनही पॉझिटिव्ह असल्याचे साईने स्पष्ट केले, त्याचा तपशील देण्याचे मात्र त्यांनी टाळले. ‘काल घेण्यात आलेल्या दुसऱया चाचणीत सर्व खेळाडू निगेटिव्ह आढळले आहेत. त्याचा अहवाल आज शुक्रवारी सकाळी मिळाला. देशभरातील साईच्या विविध केंदात सराव करीत असलेल्या सर्व खेळाडूंची दर आठवडय़ाला कोरोना चाचणी घेतली जात आहे,’ असेही साईतील सूत्रांनी सांगितले.
शुक्रवारी एकूण 16 चाचण्या घेण्यात आल्या, त्यात स्टीपलचेसचे दोन ऍथलेट्स, दोन पुरुष रेस वॉकर, मध्यम व लांब पल्ल्याचा एक धावपटू, मध्यम व लांब पल्ल्याच्या दोन महिला धावपटू, चार पॅराऍथलेट्स तसेच एक पॅराप्रशिक्षक आणि एक एनसीओई ऍथलेट यांचा समावेश होता. साईचे दोन निवासी स्टाफ व एक हाऊसकीपिंग कर्मचारी यांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत.
‘6 व 7 मे रोजी घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीत एकूण 22 ऍथलेट्स पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांना कोणतीच लक्षणे नव्हती. त्यामुळे त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवून निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. नंतर त्यांची आरटी पीसीआर चाचणी घेण्यात आली, त्यात 21 खेळाडू निगेटिव्ह आढळले. निगेटिव्ह अहवाल आलेल्या खेळाडूंत रेस वॉकर केटी इरफान, पीयू चित्रा, संदीप कुमार, पॅराऍथलेट मरियप्पन थांगवेलू यांचा समावेश आहे. हॉकीपटू चिंगलेनसाना सिंग व विवेक सागर प्रसाद यांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत,’ असे साईने सांगितले. बेंगळूरमधील साई केंद्रात हॉकीपटू, ट्रक अँड फिल्ड आणि पॅराऍथलेट् यांचे वास्तव्य असून या सर्वांना 29 एप्रिल रोजी व्हॅक्सीनचा पहिला डोस देण्यात आला आहे. या सर्वांची नंतर 10, 13 मे रोजी कोरोना चाचणी घेण्यात आली त्यावेळी 22 पैकी 21 जण निगेटिव्ह आले होते. जो एक पॉझिटिव्ह आहे, तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे, असेही साईने सांगितले.