प्रतिनिधी/ बेळगाव
शिवबसवनगर येथील केपीटीसीएल कार्यालयाशेजारी स्मार्ट रस्ता बनवून व्यापारी गाळे बांधण्यात आले आहेत. मात्र, येथील रस्त्यापेक्षा गाळय़ांचे महत्त्व वाढण्याची शक्मयता आहे. येथील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी प्रथमच महापालिका प्रशासनाने लिलाव प्रक्रिया आयोजित केली आहे. सोमवार 4 रोजी सकाळी 11 वा. लिलाव प्रक्रियेस शिवबसवनगर येथे प्रारंभ होणार आहे.
स्मार्ट रोड बनविण्याबरोबरच महसूल उत्पन्नासाठी व्यापारी गाळय़ांची निर्मिती करण्यात आली आहे. या परिसरात 14 गाळय़ांची उभारणी करण्यात आली आहे. या परिसरात शाळा, महाविद्यालये आणि वैद्यकीय महाविद्यालय तसेच केपीटीसीएल कार्यालय असल्याने नेहमी गर्दी असते. हा परिसर गजबजलेला असल्याने गाळय़ांसाठी मोठय़ा प्रमाणात मागणी वाढण्याची शक्मयता आहे. सदर गाळे भाडेतत्त्वावर देण्याकरिता महापालिका प्रशासनाने 2 लाख रुपये अनामत रक्कम आणि प्रति महिना 12 हजार रुपये किमान भाडे निश्चित केले आहे. तसेच 14 पैकी काही गाळे राखीव ठेवण्यात आले आहेत. सदर लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी 50 हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. सध्या या गाळय़ांना मागणी जास्त असल्याने गाळय़ाच्या भाडय़ाची रक्कम 20 हजारपर्यंत जाण्याची शक्मयता आहे.