वार्ताहर / केपे
केपे पालिकेत सतत सहा वेळा नगरसेवक व सहा वेळा नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळलेले आणि केपे काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष मानुएल कुलासो यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. यामुळे केपेतील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्व स्तरांतून दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
केपे पालिका स्थापना 1970 साली. मात्र त्यावेळी व त्यानंतर काही काळ प्रशासक नेमण्यात आला. 1985 मध्ये पालिका राजकारण खऱया अर्थाने सुरू झाले आणि त्याच काळात पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून येण्याचा मान कुलासो यांना प्राप्त झाला. 1988 मध्ये ते नगराध्यक्षही बनले. त्यानंतर केपे पालिकेत 1990 ते 1995 या काळात निवडणुका झाल्या नाहीत. कुलासो यांना पालिकेच्या मागील कार्यकाळापर्यंत सतत नगरसेवक बनण्याचा मान लाभला. केपे पालिकेत सहा वेळा ते नगरसेवक बनले व 1988 नंतर 1995, 1998, 2002, 2004 व 2010 असे मिळून सहा वेळा नगराध्यक्षपदही सांभाळले.
आपल्या राजकीय प्रवासात त्यांनी 2012 मध्ये एकदा विधानसभा विधानसभा निवडणूकही लढवली. सुरुवातीपासून ते काँग्रेसचे खंदे कार्यकते होते. मात्र काही काळ मतभेद झाल्याने ते युगोडेपा पक्षात व त्यानंतर स्व. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना भाजपमध्ये गेले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. ते आता केपे काँग्रेस गट समितीते अध्यक्षही होते. यंदा झालेल्या पालिका निवडणुकीत त्यांचा प्रभाग राखीव असल्याने त्यांनी दुसऱया प्रभागातून निवडणुक लढवली होती. मात्र निवडणूक उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते आजारी पडले होते. त्यानंतर ते प्रचारकार्यात उतरले नव्हते व पालिका निवडणुकीत पराभूत झाले होते.
कुलासो यांचा केपेतील राजकारणात बराच दबदबा होता. शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत 1985 मध्ये नगरसेवक बनलेले व गेली 35 वर्षे राजकारणात सक्रिय असलेले माजी नगराध्यक्ष राऊल पेरेरा यांनी सांगितले की, आपण एक खरा मित्र गमावला असून कुलासो यांच्या जाण्याने राजकारणाचेच नव्हे, तर केपेचे मोठे नुकसान झाले आहे.
यावेळी केपेतील काँग्रेस नेते एल्टन डिकॉस्ता यांनी सांगितले की, गेल्या काही काळात आपण त्यांना जवळून पाहिले होते. त्यांची काम करण्याची पद्धत, प्रामाणिकपणा आपल्याला आवडत होता व त्यांचा सदैव आपल्याला पाठिंबा मिळाला होता. त्यांनी सदैव लोकांना मदत केली. कोणतेही काम होत नसे तेव्हा लोक त्यांच्याकडे येत होते व ते कसलाच भेदभाव न करता काम करायचे, असे त्यांनी सांगितले. यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर, माजी मंत्री आलेक्स सिकेरा, एल्टन डिकॉस्ता, केपे नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर यांच्यासह अनेकांनी कुलासो यांचे अंतिम दर्शन घेतले.