कोची
दिल्ली मेट्रोपासून प्रत्येक शहरात मेट्रोच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजाणारे ई श्रीधरन ‘मेट्रो मॅन’ नावाने प्रख्यात आहेत. ई श्रीधरन यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेत सर्वांनाच चकित केले आहे. तर श्रीधरन हे आता केरळमध्ये मुख्यमंत्रिपदाचे दावेदार ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना श्रीधरन यांनी लव्ह जिहादच्या विरोधात असल्याचे सांगत हिंदू युवतींना जाळय़ात ओढले जात असल्याचे म्हटले आहे. केरळमध्ये लव्ह जिहादाचा प्रकार सुरू असल्याचे आपण जाणतो असे श्रीधरन यांनी नमूद केले आहे. निवडणुकीपूर्वी त्यांनी केलेल्या या विधानामुळे केरळमध्ये खळबळ उडाली आहे. या विधानाला निवडणुकीच्या रणनीतिशी जोडून पाहिले जात आहे. हिंदू युवतींना विवाहासाठी कसे जाळय़ात ओढले जात आहे, हे मी पाहत आहे. केवळ हिदूंच नव्हे तर ख्रिश्चन युवतींनाही विवाहासाठी फसविले जात आहे. निश्चितपणे मी लव्ह जिहादचा विरोध करणार असल्याचे श्रीधरन म्हणाले. लव्ह जिहादवरून विविध भाजपशासित राज्यांनी कायदा आणला असताना त्यांनी ही टिप्पणी केली आहे. या कायद्यांच्या विरोधात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.