वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळ क्राइम बँच पोलिसांनी एक आश्चर्यजनक निर्णय घेतला आहे. हा निर्णय 6 एप्रिल रोजी विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादी उघड होण्याच्या एका तक्रारीच्या चौकशीशी संबंधित आहे.
संयुक्त मुख्य निवडणूक अधिकाऱयांकडून तक्रार नोंदविण्यात आल्यावर तपास सुरू करण्यात आला होता. केरळच्या 2.67 कोटी मतदारांची यादी लीक झाल्याने हा तपास हाती घेण्यात आला होता. गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक शाह नवाज हे तपासाचे नेतृत्व करणार आहेत.
निवडणुकीपूर्वी तत्कालीन विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांनी मुख्य निवडणूक अधिकारी टीका राम मीणा यांची भेट घेत मतदारयादीत फेरफार झाल्याची तक्रार केली होती. हा एका कटाचा भाग असल्याचा दावाही त्यांनी केला होता.
मतदारयादीचे अवलोकन केल्यावर एका मतदारसंघात एकाच व्यक्तीला अनेक ओळखपत्रे देण्यात आल्याचे आढळून आले आहे. या ओळखपत्रांवरील पत्ते आणि अन्य तपशीलात किरकोळ बदल असले तरीही छायाचित्र एकच असल्याचा आरोप चेन्निथला यांनी केला होता.
हा फेरफार कसा झाला हे सर्वजण जाणून घेऊ इच्छित असल्याने याचा तपास केला जावा. नव्या तपासाच्या माध्यमातून खरा खलनायक कोण हे समजणार नाही, कारण हा तपास यादी कशी लीक झाली यासंबंधीचा असल्याचे चेन्निथला यांनी म्हटले आहे.