देशाच्या महाधिवक्तेपदी कायम राहणार
नवी दिल्ली
ज्येष्ठ वकील के.के. वेणुगोपाल पुढील 1 वर्षांपर्यत महाधिवक्तेपदी कायम राहणार आहेत. राज्यघटनेचे तज्ञ मानले जाणारे वेणुगोपाल चालू महिन्यात निवृत्त होणार होते, परंतु पुढील एक वर्षासाठी त्यांचा कार्यकाळ वाढविण्यात आला आहे. कोट्टयन कटंकोट वेणुगोपाल यांना 2017 मध्ये देशाचे 15 वे महाधिवक्ते म्हणून नियुक्त करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह यांनी वेणुगोपाल यांच्या शासकीय निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच वेणुगोपाल यांना मुदतवाढ मिळणार असल्याचा कयास वर्तविला जात होता. 90 वर्षीय वेणुगोपाल यांची केंद्र सरकारने आणखी एक वर्षासाठी कार्यरत राहण्यासाठी अखेर संमती मिळविली आहे. पद्मभूषण आणि पद्मविभूषणने सन्मानित वेणुगोपाल यांनी मोरारजी देसाई यांच्या सरकारदरम्यान देखील सुमारे अडीच वर्षांपर्यंत अतिरिक्त महाधिवक्ते म्हणून काम पाहिले हेते. 2-जी प्रकरणी त्यांनी सीबीआय आणि ईडीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद मांडला होता. अयोध्या प्रकरणी कल्याण सिंगच्या वतीने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली होती.