प्रतिनिधी/ बेळगाव
चित्रकार आपल्या कलाकृतीतून समाजातील वेगवेगळय़ा गोष्टी रसिकांसमोर आणत असतो. प्रत्येक माणसाकडे कला असते. त्या कलेला फक्त चालना देऊन ती बाहेर आणता आली पाहिजे. कला ही माणसाला जगवते. त्यामुळे प्रत्येकाने एखादी कला जोपासून प्रगतीकडे वाटचाल केली पाहिजे, असे विचार रवी परांजपे यांनी मांडले.
चित्रकर्मी के. बी. कुलकर्णी जन्मशताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून त्यांचे शिष्य व सुप्रसिद्ध चित्रकार कै. जॉन फर्नांडिस यांनी रेखाटलेल्या चित्रांच्या प्रदर्शनाचे बुधवारी संगमेश्वरनगर येथील गॅलरीत उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी दत्ता पाडेकर, मारुती पाटील व एस. एस. मुरगोड आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. जॉन फर्नांडिस यांच्या पत्नी आग्नेस फर्नांडिस यांच्या प्रयत्नातून या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दत्ता पाडेकर व एस. एस. मुरगोड यांनीही विचार व्यक्त केले.
या प्रदर्शनात 40 हून अधिक निसर्ग व व्यक्तीचित्रे प्रदर्शित केली असून तैलरंग, जलरंग, ऑईल कलर्स, ड्राय पेस्टल, चारकोल पेन्सिलच्या माध्यमातून साकारलेल्या चित्रांचा समावेश यामध्ये आहे. हे प्रदर्शन संगमेश्वरनगर, 10 वा क्रॉस येथील कै. जॉन फर्नांडिस गॅलरीत भरविण्यात आले असून बुधवार दि. 5 पासून ते दि. 11 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सर्वांना खुले राहणार आहे. बेळगावकरांनी आपल्या कुटुंबीयासमवेत या चित्रप्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
याप्रसंगी चित्रकार अनिकेत कांबळे, तृष्णा मोरे, मायकल फर्नांडिस, जॉय फर्नांडिस, मुक्ता बालिका, मार्शल फर्नांडिस, लिला पाटील यासह अनेक चित्रकार, चित्रपेमी बहुसंख्येने उपस्थित होते.