फॅशनच्या जगात कधी काय टेंडी ठरेल याचा नेम नसतो. घेरदार घागरा, अनारकली यांच्या लोकप्रियतेनंतर सध्या साडय़ांचा, त्यातही हँडलुमच्या सुती साडय़ांचा जमाना आहे. अगदी कॉर्पोरेट इव्हेंटस्नादेखील तरुणी, मध्यमवयीन महिला दिमाखात व आत्मविश्वासाने सुती साडय़ा वापरताना दिसतात. पूर्वीप्रमाणे आज त्यांच्यापाशी मर्यादित व एकसुरे पर्याय नसून निवडीस भरपूर वाव असतो. कंची कॉटन, कलकत्ता, ओरिसा, कांथावर्क, बांधणी, साऊथ कॉटन, कोईमतूर कॉटन, कॉटन नारायणपेठ, कॉटन पैठणी, इरकल, सुंगुडी, हुबळी कॉटन असे एक ना दोन, शेकडो पर्याय उपलब्ध आहेत. मात्र कुठलीही कॉटन साडी वापरण्याआधी त्याला कडक इस्त्री व्हायलाच हवी, तरंच ती दिवसभर टिकून राहते. खांद्यावरचा पदर व निऱया हलवल्या नाहीत तर व्यवस्थित जागेवर टिकून राहतात. पदराच्या निऱया वीतभर रूंदीच्या करून कमरेला बेल्ट बांधता येतो. सुती साडय़ांचा सिंगल पदर घेऊन मग त्यावर आणखी एक पदर घेतला की यामुळे गळय़ातील दागिना खुलून दिसतो व हालचालीही सुकर होतात. पदराच्या निऱया व कमरेच्या निऱया रात्रीच करून ठेवून पिन लावून ठेवल्यास सकाळी घाईच्यावेळी पाच मिनिटात साडी नेसता येते. सुती साडीवर एथनिक ज्वेलरी खुलून दिसते. हातभर बांगडय़ादेखील वापरता येतात.
Previous Articleजेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल ताब्यात
Next Article सीमाप्रश्नावर चर्चेसाठी पंतप्रधानांना भेटणार