पहिल्या दिवसअखेर न्यूझीलंड 5 बाद 258, यंगचेही अर्धशतक
वृत्तसंस्था/ माऊंट माँगेनुई
डेव्हॉन कॉनवेच्या समयोचित शानदार शतकाने शनिवारपासून येथे सुरू झालेल्या बांगलादेशविरूद्ध पहिल्या कसोटीत न्यूझीलंडचा पहिला डाव सावरला. दिवसअखेर न्यूझीलंडने पहिल्या डावात 87.3 षटकांत 5 बाद 258 धावा जमविल्या. कॉनवेने 122 तर यंगने 52 धावा झळकविल्या.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. न्यूझीलंडच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. बांगलादेशच्या शदमान इस्लामने डावातील चौथ्या षटकांत न्यूझीलंडचा सलामीचा फलंदाज आणि कर्णधार लॅथमला केवळ एका धावेवर दासकरवी झेलबाद केले. त्यानंतर यंग आणि कॉनवे यांनी संघाचा डाव सावरताना दुसऱया गडय़ासाठी 42 षटकांत 138 धावांची भागीदारी केली. दरम्यान बांगलादेशच्या दासने न्यूझीलंडच्या यंगला चोरटी धाव घेताना धावचीत केले. त्याने 135 चेंडूत 6 चौकारांसह 52 धावा जमविल्या.
कॉनवे आणि रॉस टेलर या जोडीने एकेरी आणि दुहेरी धावावर भर देत धावफलक हालता ठेवला. या जोडीने तिसऱया गडय़ासाठी 50 धावांची भागिदारी केली. शदमान इस्लामने न्यूझीलंडची ही जोडी फोडताना रॉस टेलरला झेलबाद केले. त्याने 64 चेंडूत 5 चौकारांसह 31 धावा जमविल्या.
न्यूझीलंडच्या कॉनवेने 227 चेंडूत 1 षटकार आणि 16 चौकारांसह 122 धावा झळकविल्या. तो चौथ्या गडय़ाच्या रूपात बाद झाला. मोमिनुल हकने कॉनवेला लिटॉन दासकरवी झेलबाद केले. बांगलादेशच्या इबादोत हुसेनने ब्लंडेलचा 11 धावांवर त्रिफळा उडविला. न्यूझीलंडने दिवसअखेर 87.3 षटकांत पहिल्या डावात 5 बाद 258 धावा जमविल्या. बांगलादेशतर्फे शदमान इस्लामने 53 धावांत 2 तर मोमिनूल हकने आणि इ. हुसेन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड प. डाव- 87.3 षटकांत 5 बाद 258 (कॉनवे 122, यंग 52, लेथम 1, रॉस टेलर 31, ब्लंडेल 11, निकोल्स खेळत आहे. 32, शदमान इस्लाम 2-53, इबादत हुसेन 1-53, मोमिनूल हक 1-5).