पालकमंत्री उदय सामंत यांनी केला चॅनेलच्या कार्याचा गौरव : महाडबलबारी सामन्याला उत्स्फूर्त प्रतिसाद : सामंत यांचा वाढदिवसही साजरा
प्रतिनिधी / कुडाळ:
कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्येही कोकण नाऊने सामाजिक उपक्रम राबविले. कोकण नाऊच्या या सामाजिक उपक्रमांची दखल शासनानेही घेणे आवश्यक आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कोकण नाऊवर शनिवारी सायंकाळी लाईव्ह महाडबलबारीचा महासंग्राम आयोजित केला होता. त्याच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री उपस्थित होते. यावेळी सादर झालेल्या महाडबलबारीला जगभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी पालकमंत्री सामंत यांचा वाढदिवस कोकण नाऊ परिवारातर्फे साजरा करण्यात आला.
ख्यातनाम भजनी बुवा विजय उर्फ गुंडू सावंत (वर्दे, कुडाळ) आणि त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी तडफदार भजनी बुवा संदीप लोके (लिंगडाळ, देवगड) यांच्यात हा महाडबलबारीचा सामना रंगला. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. दोन्ही बुवांमध्ये पहिल्यापासूनच जुगलबंदी पाहायला मिळाली. जिल्हय़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांची यांची उपस्थिती महत्वपूर्ण ठरली. पालकमंत्री सामंत आणि महाडबलबारीची मेजवानी प्रेक्षकांसाठी अतुलनीय ठरली. आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक सदस्य सतीश सावंत, संदेश पारकर, मंदार केणी, संजय भोगटे, नगरसेविका दर्शना कासवकर तसेच संचालक विकास गावकर, संचालिका वैशाली गावकर, ओंकार गावकर, संपादक नीलेश उर्फ बंडय़ा जोशी, ब्युरो साईनाथ गावकर, रोहन नाईक, मेघनाथ सारंग, वैभव गावडे, विश्वंभर परब, संचिता कोलपाटे, विल्प्रेड फर्नांडिस, चिन्मय घोगळे, उमेश बुचडे, योगेश खाडे, ऋतुजा मर्गज, मनीषा केरकर यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री सामंत म्हणाले, यापूर्वी माझा वाढदिवस रत्नागिरी जिल्हय़ात साजरा व्हायचा. पण यावर्षी पालकमंत्री म्हणून रत्नागिरी जिल्हय़ाच्या बाहेर पहिलाच वाढदिवस साजरा होतोय. या महाडबलबारीतील दोन्ही भजनी बुवा कितीही विरोधक असले, तरी त्यांचे उद्दिष्ट एकच आहे. जिल्हय़ाच्या विकासाची संकल्पना या दोन्ही भजनी बुवांकडून शिकली पाहिजे. पक्ष वेगवेगळे असले, तरीही सर्वांचे उद्दिष्ट हे विकासाचे हवे. आज जिल्हय़ाच्या विकासाचा संकल्प करण्याचा दिवस असून सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
कोकणच्या लोककलांना कोकण नाऊ चॅनेलने नेहमीच व्यासपीठ दिले आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक कलाकार घरी बसलेले असताना कोकण नाऊने या कलाकारांना संधी दिली. संयुक्त दशावतार लाईव्ह करणारे ‘कोकण नाऊ’ हे कोकणातले पहिले चॅनेल ठरले. दशावतारापाठोपाठ ‘डबलबारीचा महासंग्राम’ या कार्यक्रमालाही श्रोत्यांनी भरपूर प्रतिसाद दिला. ‘कोकण नाऊ’ ने इलेक्ट्रॉनिक मीडियात गरुडझेप घेतली आहे. कोकणातील लोककलेचा महाजागर करण्याच्या उद्देशाने कोकण नाऊच्या यूटय़ूब चॅनेलवर लाईव्ह डबलबारीचा घमासान सामना पाहायला मिळाला. दोन्ही भजनीबुवांना गुगल पेद्वारे भरघोस बक्षिसे मिळाली.
या लाईव्ह महाडबलबारीत पहिल्यापासूनच दर्शकांनी सूचविलेली गाणी किंवा अभंग, नाटय़गीते, गौळण दोन्ही बुवांनी सादर केली. संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, खासदार आणि जिल्हय़ाचे सुपुत्र नारायण राणे व पालकमंत्री सामंत यांच्या वाढदिनी विशेष गीत व फर्माईशी सादर करण्यात आल्या.
बुवा गुंडू सावंत आणि संदीप लोके यांच्यात तडफदार सामना पाहायला मिळाला. दोन्ही बुवांनी एकमेकांना कोपरखळय़ा मारत प्रेक्षकांना खिळवून ठेवले. प्रेक्षकांनीही दाद देताना ऑनलाईन बक्षिसे, गाण्याच्या फर्माईशी केल्याने हा महासंग्राम मध्यरात्रीपर्यंत रंगला. सांगतेवेळी गुंडू सावंत यांचे पखवाजवादक विराज बावकर आणि बुवा संदीप लोके यांचे पखवाजवादक योगेश सामंत यांच्यात झालेली संगीत जुगलबंदी प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरली. केवळ कोकण आणि महाराष्ट्रातच नव्हे, तर देशाबाहेरून म्हणजे लंडन, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, दुबई, मलेशिया यासारख्या देशात वास्तव्यास असलेल्या मराठी प्रेक्षकांनी या लाईव्ह कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. प्रास्ताविकातून संचालक विकास गावकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. सूत्रसंचालन ओंकार गावकर, संचिता कोलपाटे यांनी केले. आभार ब्युरो साईनाथ गावकर यांनी मानले.