लोकार्पणासाठी 8 डब्यांची नवी एक्स्प्रेस मडगावकडे यार्डात
प्रतिनिधी/ खेड
कोकण मार्गावर धावणाऱ्या सुपरफास्ट मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसची प्रतीक्षा अखेर संपुष्टात येणार आहे. आरसीएफ चेन्नई (चेन्नईमधील इंटिग्रेटेट कोच फॅक्टरी) येथून निघालेली 8 डब्यांची नवी वंदे भारत एक्स्प्रेस उद्घाटनासाठी शनिवारी रात्री 10 वाजून 32 मिनिटांनी उडपी स्थानक सोडून रिकामी गाडी मडगावच्या दिशेने रवाना झाली. सद्यस्थितीत वंदे भारत एक्स्प्रेस मडगाव रेल्वे स्थानकाच्या यार्डात उभी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
वंदे भारत एक्स्प्रेसच्या लोकार्पणाची तारीख अजून निश्चित झाली नसली तरी काही दिवसातच एक्स्प्रेस कोकणवासियांच्या सेवेत दाखल होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करणार असल्याचे समजते. कोकण मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यास महाराष्ट्रात सुरू होणारी पाचवी तर कोकणातील पहिली सेवा ठरणार आहे.
13 दिवसांपूर्वी मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याने कोकण मार्गावर एक्स्प्रेस नियमित करण्याचा निर्णय केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. यामुळे वंदे भारत एक्स्प्रेस कोकण मार्गावर नेमकी धावणार तरी कधी, याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली आहे. याशिवाय वंदे भारत एक्स्प्रेसला कोकण मार्गावरील गजबजणाऱ्या रेल्वे स्थानकांमध्ये थांबा देण्यासाठी कोकण विकास समितीसह जल फाऊंडेशन व प्रवासी संघटनांनी आग्रह धरला आहे.
मुंबई ते मडगावदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची अधिकृत तारीख अद्यापही रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेली नाही. मात्र, ही एक्स्प्रेस कोकण मार्गावर चालवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्व तयारीही झाली आहे. शनिवारी सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार, आरसीएफ चेन्नई येथून कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी नवा 8 डब्यांचा रॅक मडगावच्या दिशेने रवाना झाला. सद्यस्थितीत नवी वंदे भारत एक्स्प्रेस मडगाव स्थानकाच्या यार्डात उभी आहे. मडगाव येथे या एक्स्प्रेसच्या उद्घाटनाच्या दृष्टीने तयारीही केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे वंदे भारत एक्स्प्रेस येत्या काही दिवसातच सेवेत दाखल होणार असल्याने कोकणवासियांची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे.