नागपूर-मडगाव, पुणे-मडगावचा समावेश, मुंबई व पुणेस्थित चाकरमान्यांना दिलासा
प्रतिनिधी / खेड
कोरोना हळूहळू नियंत्रणात येत असल्याने रेल्वे प्रशासनाने एकामागोमाग एक कोकण मार्गावर रेल्वे गाड्या चालवण्यास प्रारंभ केला आहे. त्यानुसार २३ ऑक्टोबरपासून कोकण मार्गावर नागपूर-मडगाव व पुणे-मडगाव साप्ताहिक फेस्टिवल स्पेशल रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन रेल्वेगाड्यांमुळे मुंबई व पुणेस्थित चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर २१ पासून वास्को द गामा-पटना ही साप्ताहिक सुपरफास्ट फेस्टिवल स्पेशल रेल्वेगाडी धावणार आहे. २१ डब्यांच्या या गाडीला पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. यापाठोपाठच २३ व ३० ऑक्टोबर, ६ नोव्हेंबर या कालावधीत नागपूर – मडगाव साप्ताहिक फेस्टिवल स्पेशल गाडी धावणार आहे.
नागपूर येथून सायंकाळी ४ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी मडगावला पोहचेल. परतीच्या प्रवासात मडगाव येथून सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ८.३० वाजता नागपूरला पोहचेल. या गाडीला कोकण मार्गावर पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ सावंतवाडी आदी स्थानकावर थांबे देण्यात आले आहेत.
पुणे-मडगाव फेस्टिवल स्पेशल २३, ३० ऑक्टोबर व ६ नोव्हेंबर यादरम्यान धावणार आहे. पुणे येथून सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी सुडून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता मडगावला पोहचेल. परतीच्या प्रवासात मडगाव येथून सायंकाळी ४ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ५.५० वाजता पुणे येथे पोहचेल. २२ डब्यांच्या या गाडीला लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आदी ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत.