वारणानगर / प्रतिनिधी
पायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी अशोक शिवाजी कांबळे या ७० वर्षाच्या वृध्दाला शस्त्रक्रिया विभागात पाच तास ताटकळत झोपवून बेपत्ता झालेले अस्थिरोग तज्ञ डॉ. सुर्यकांत सातपुते यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी मनसेच्यावतीने उद्या दि. १६ रोजी रूग्णालया समोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
रूग्ण अशोक कांबळे याला शस्त्रक्रियेकरिता विभागात घेण्याची सूचना देवून भूलतज्ञाना यायला उशीर होत आहे. म्हणून डॉ. सातपुते कोणालाही कल्पना न देता रूग्णालयातून निघून गेले उशीरा पर्यन्त मोबाईल देखील त्यांनी स्वीकारत नव्हते त्यामुळे कोडोली उपजिल्हा रुग्णालयात अशा बेजाबदार पणाच्या घडलेल्या घटनेला त्यांना जबाबदार धरून निलंबीत करावे अन्यथा रुग्णालया समोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन कोडोली मनसेच्या वतीने उपाध्यक्ष नयन गायकवाड यांनी प्रशासनाला दिले आहे.
कोडोली येथील अशोक कांबळे हे आपला उजवा पाय दुखु लागल्याने दहा दिवसापासून कोडोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. पायाच्या दुखण्याबाबतची तपासणी रुग्णालयातील अस्थिरोग तज्ञ सूर्यकांत सातपुते यांनी तपासणी केली. यावेळी कांबळे यांच्या या पूर्वी पायावरती झालेल्या शस्त्रक्रियेमध्ये पायात घातलेल्या रॉडमुळे रक्तस्राव व पस झाल्याचे डॉक्टर सातपुते यांनी सांगितले. त्यामुळे पायावरती तातडीने शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले. शस्त्रक्रिया करणेसाठी आज उद्या करुया असे म्हणत कांबळे यांना गेले दहा दिवस डॉक्टर सातपुते यांनी टोलवून ठेवले परंतु पायाच्या वेदना सहन न झाल्याने कांबळे ओरडत होते. तथापि बुधवारी शस्त्रक्रिया करुया असे कांबळे यांना डॉक्टर सातपुते यांनी सांगितले. त्याचबरोबर रुग्णालयातील भूलतज्ञ व नर्सेस यांनाही सूचना दिल्या होत्या त्यानुसार रुग्णालयातील कर्मचारयांनी सकाळी दहा वाजता कांबळे यांना शस्त्रक्रिया विभागात नेऊन त्यांना शस्त्रक्रिये पूर्वीची औषधे देऊन ऑपरेशन डेक वरती कांबळे यांना झोपविले होते. तथापि शस्त्रक्रिया करणेसाठी डॉ.सातपुते रुग्णालयात आलेच नाहीत.
रुग्णालयातील भूलतज्ञ डॉ. ज्योती कोले यांना कांबळे यांची शस्त्रक्रिया करायची आहे. यासाठी डॉ. सातपुते गेली तीन दिवस सलग बोलवत होते सुट्टी असूनही डॉ. कोले या येत होत्या तथापी डॉ. सातपुते हे टाळाटाळ करीत असल्याचे स्पष्ट झाले या कारणास्तव त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली असून कारवाईवासाठी वरिष्ठाकडे अहवाल पाठवणार असल्याचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिवाकर खाबडे यानी सांगीतले.
बेजबाबदार डॉक्टरांनी सरकारी रुग्णालयात दाखल असणाऱ्या गरीब सामान्य रुग्णांच्या जीवाशी खेळू नये जमेत नसेल तर नोकरी सोडावी दैनदिन व तात्काळ सेवेचे वेळापत्रक दर्शनी लावावे उशीरा येणाऱ्या डॉक्टरांची नोंद घेण्यात यावी प्रत्येक डॉक्टरने बाह्यरुग्ण विभागात किती रुग्ण तपासले उपचार केले याचा प्रति महिना अहवाल तयार करावा काम चुकार अधिकारी व कर्मचारी यांचे वर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वैभव कांबळे, दलित महासंघाचे अशोक गायकवाड यानी प्रशासनाकडे केली.