राजकीय पक्षांचे झेंडे, चिन्हे, नेत्यांच्या छायाचित्रांवरही निर्बंध
प्रतिनिधी/ बेळगाव
सध्या ग्राम पंचायत निवडणुकीचे धामधूम सुरू आहे. ही निवडणूक राजकीय पक्षविरहित आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारात कोणत्याही पक्षाचे चिन्ह, झेंडे, राजकीय नेत्यांची छायाचित्रांच्या वापरावर निर्बंध आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱयांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिला आहे.
जिल्हाधिकाऱयांनी रविवारी रात्री एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. निवडणूक रिंगणातील उमेदवारांना मुक्त चिन्हांचे वाटप केले जाते. निवडणूक प्रचार कायद्याचे उल्लंघन होऊ नये यासाठी उमेदवारांनी राजकीय पक्षांचे नेते, चिन्हे व झेंडय़ांचा वापर करू नये, अशी सूचना जिल्हाधिकाऱयांनी दिली आहे.
एखाद्या राजकीय पक्षाकडून आयोजित केल्या जाणाऱया समारंभात व्यासपीठावर पक्षाचा झेंडा किंवा बॅनरचा वापर करू नये. उमेदवारांच्यावतीने मतयाचना करताना आपल्या पक्षाचा पुरस्कृत उमेदवार आहे, यालाच मतदान करा, असे आवाहनही करू नये, अशी सूचनाही जिल्हा दंडाधिकाऱयांनी पत्रकात केली आहे.
उमेदवारांकडून छापल्या जाणाऱया पत्रकात राजकीय पक्षांचे नेते व पक्षांच्या चिन्हांचा वापर करू नये. बॅनर, कटआऊटचा वापर प्रचारात करू नये. वृत्तपत्रे व दूरदर्शन माध्यमांना जाहिराती देतानाही राजकीय पक्षांच्या नेत्यांची छायाचित्रे व पक्षाच्या चिन्हांचा वापर करू नये. या सूचनांचे उल्लंघन केल्यास प्रचारसामग्री जप्त करण्याबरोबरच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे.