उस्मानाबाद / तरूण भारत संवाद प्रतिनिधी :
उमरगा तालुक्यातील दिव्यांग व्यक्तीना सन्मानाने जगता यावे या हेतूने २६ लाख रुपयांचे साहित्य देण्यात आले आहे. त्याच्या राहणीमानात सुधारणा व्हावी व जीवन जगताना आनंद मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्यावतीने प्रयत्न करीत आहे. दिव्यांगांनी खचून न जाता धैर्याने जीवन जगावे जगण्याचा खरा आनंद घ्यावा, कोणतीही दिव्यांग व्यक्ती या लाभापासून वंचित राहणार नसल्यामुळे प्रत्येकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे यांनी केले.
शहरातील पंचायत समितीच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनीच्या सी.एस.आर. योजने अंतर्गत व जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग, पंचायत समितीच्यावतीने तालुक्यातील २९४ दिव्यांग लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. समाजात जन्माला येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना सन्मान मिळाला पाहिजे. दिव्यांग व्यक्तीच्या सर्वांगीन प्रगतीसाठी जिल्हा परिषदेच्यावतीने विशेष मोहीम राबविण्यात येत असून जन्मल्यापासून ज्या दिव्यांगाना आव्हानाचा सामना करावा लागतो. त्याना पाठबळ देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे दिव्यांगांनी खचून न जाता धैर्याने जीवन जगावे व स्वतःचा विकास साधावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी केले.
यावेळी पं.स. सभापती सचिन पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य धनराज हिरमुखे, पंचायत समितीच्या सदस्या सुवर्णा भालेराव, संगिता मारेकर, गटविकास अधिकारी कुलदिप कांबळे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी नागनाथ चौगुले, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटील खंडापूरकर, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शिंदे, जिल्हाध्यक्ष इसाक शेख, महिला प्रदेशाध्यक्ष राणीताई स्वामी, लातूरच्या महावितरणच्या अति उच्च दाब प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक गडदे, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगमचे सल्लागार कमलेश यादव आदींची उपस्थिती होती.
समाजकल्याण विभागाचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते भारत कांबळे, वरिष्ठ सहाय्यक नंदु पवार, कार्यालयीन अधिक्षक सचिन कुलकर्णी, मुख्याध्यापक भगवान वाघमारे, अधीक्षक बालाजी शिंदे आदी कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. यावेळी तालुक्यातील दिव्यांग लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन कृषी अधिकारी महेश बिडवे यांनी तर सर्वांचे आभार समाजकल्याण अधिकारी चौगुले यांनी मानले.