युवक कला मंचने उभारलेले ग्रंथालय जमीनदोस्त
प्रतिनिधी /म्हापसा
पिळगाव येथील युवक कला मंच या संस्थेला आज 27 वर्ष पूर्ण झाली असून गावात या संस्थेमार्फत आजवर विविध कार्यक्रम आखले आहेत. त्यात प्रमुख कार्यक्रम म्हणजे गावात ज्ञान पसरण्यासाठी या संस्थेने गावातील नागरिकंसाठी ग्रंथालय उभे केले. सध्या येथे 5 हजाराहून अधिक पुस्तके आहेत. यामुळे गावातील नागरिक येथे विद्याज्ञान घेऊ लागले. 1997 साली सुरू झालेल्या या ग्रंथालयाला आज 24 वर्षे पूर्ण झाली असली तरी आज मात्र पिळगावात ग्रामस्थ ग्रंथालयाअभावी कुणी पेपर देता का हो वाचायला असे बोलताना पहायला मिळते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गेली 27 वर्षे युवक कला मंच येथे विविध उपक्रम राबवित असून आता हे ग्रंथालयच पूर्णतः जमिनदोस्त झाल्याने येथील लोकांचे व विद्यार्थ्यांचे ग्रंथालयअभावी हाल झाले आहे. यावेळी बोलताना संस्थेचे माजी अध्यक्ष संदेश गोवेकर म्हणाले की, युवक कला मंच संस्थेकडे स्वतःची अशी इमारत नाही. आम्ही प्रत्येकवेळी कुणाचा तरी इमारत वा खोली भाडेपट्टीवर घेतो. माफक दरात आम्हाला कुणी भाडेपट्टीवर देतात कोमुनिदादने आम्हाला मदत केली. आम्ही पंचायत मंडळ, स्थानिक आमदार तसेच कला सांस्कृतिक शिक्षण खात्याकडे पत्रव्यवहार करून निदान छोटी तरी जागा आम्हाला उपलब्ध करून द्यावी मात्र आमच्याकडे कुणीच लक्ष दिले नाही. गावातील नागरिक घारसो सुर्लीकर, उमाकांत परब गांवकर यांनी याकामी आम्हाला खूप मदत केली. कोमुनिदाद घर कोसळल्यानंतर आम्ही उघडय़ावर ताडपत्री घालून सहा महिने तेथे ग्रंथालय चालविले.
ग्रंथालयाच्या बाजूला असलेल्या फातिमा बेग यांनी आपले मातीचे घर ग्रंथालयासाठी वापरण्यास दिले. त्यांच्या जागेत सुमारे दोन वर्षे काढली. मात्र गेल्या आठवडय़ात पडलेल्या मुसळधार पावसामुळे तेथील भिंतीही कोसळल्याने आतील सर्व पुस्तके आदी सामान पडून खराब झाल्याने गावात पुन्हा एकदा या ग्रंथालयाला नुकसान झाले. गावाच्या हितासाठी गेली 27 वर्षे युवक कला मंच आपल्या परीने सहाय्य करीत असले तरी आज या मंचालाच सहाय्य करण्याची वेळ गावात आली आहे. गावात ग्रंथालय उभारण्यासाठी हा मंच आपल्या परीने सर्वत्र जागेच्या शोधात असून ही जागा उपलब्ध झाल्यास एक नव्या दिमाखाने येथील ग्रंथालय आम्ही उभा करणार असल्याचा संकल्प गावातील नागरिकांनी आखला आहे.
एका बाजूने सर्वजण साक्षात्कार व्हावे सर्वांना शिक्षण मिळावे म्हणून सरकार सर्वोतोपरी सहाय्य करीत असले तरी गेली 27 वर्षे गावाच्या हितासाठी लढणारे युवक कला मंच मात्र ग्रंथालयासाठी आजही आपले सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत. सरकारने व स्थानिक आमदाराने याकडे लक्ष घालून निदान पिळगावमध्ये जी सरकारी शाळा आहे तेथे जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सुनील पिळगावकर, संदेश गोवेकर, संदीप पिळगावकर, सगुण चांदेलकर, श्वेता चांदेलकर, देवीदास गावकर, किरण सावंत, संजय गोवेकर, नरेश चांदेलकर, रामदास कवळेकर, प्रदीप उसापकर यांनी केली आहे.
भाजपा सरकारमध्ये पहिल्यांदा आंदरणीय मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री झाले तेव्हा दुसऱयाच दिवशी ते या संस्थेच्या वर्धापनदिनी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी संस्थेला आश्वासन दिले होते की कुठेतरी वाचनालय सुरू करून दिले जाईल. पण काही काळ गेल्यावर ते भारताचे संरक्षण मंत्री झाले. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधता आला नाही. सध्याचे भाजपा सरकारचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याबाबतीत लक्ष घालतील काय व सोयीप्रमाणे सरकारी इमारतीची मंजुरी करून द्यावी काय अशी मागणी संस्थेतर्फे करण्यात येत आहे.
शिक्षणाच्या बाबतीत सरकार मोठमोठय़ा वाचा करत असली तरी सरकारी दरबारी पत्रव्यवहार करूनही या ग्रंथालयाची दखल कुणी घेत नाही अशी खंत संस्थेच्या पदाधिकाऱयांनी व्यक्त केली आहे.