सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर होण्याची राधानगरी तालुक्यातील पहिलीच घटना
वार्ताहर / धामोड
कोते ( ता. राधानगरी ) येथील लोकनियुक्त सरपंच अनिता सचिन पाटील यांच्यावर नऊ सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव ग्रामस्थांच्या विशेष सभेत मतदान प्रक्रियेने मंजूर करण्यात आला. ठरावाच्या बाजूने ९३२ तर ठरावाच्या विरुद्ध बाजूने ५९० मतदान झाले. अध्याशी अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी डॉ . संदिप भंडारी यांनी काम पाहीले. लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर होण्याची राधानगरी तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.
गोतेवाडी, मानेवाडी मिळून कोते ग्रुप ग्रा.पंचायत आहे. तीन वर्षापूर्वी या ग्रा .पं. ची निवडणूक युवा आघाडी विरोधात अंबाबाई ग्रामविकास आघाडी अशी दुरंगी झाली होती. युवा आघाडीच्या अनिता सचिन पाटील या लोकनियुक्त सरपंच म्हणून विजयी झाल्या. तर अंबाबाई ग्रामविकास आघाडीचे सर्वच नऊ सदस्य विजयी झाले होते. तेंव्हापासून राजकीय वर्चस्ववाद विकोपाला गेला होता. सरपंच विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात. सरपंच पतीचा कारभारात हस्तक्षेप या कारणावरून नऊ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता .
या पार्श्र्वभूमीवर अध्याशी अधिकारी पं . समिती गटविकास अधिकारी डॉ . संदिप भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा होऊन आज शुक्रवारी मतदान घेण्यात आले. एकूण २१०२ मतदारापैकी सकाळी ८ ते ११ या वेळेत उपस्थित १६१४ मतदारांची नोंदणी झाली. ११ ते ४ या वेळेत चार मतदान केंद्रावर प्रत्यक्ष १५९९ इतके मतदान झाले. सायंकाळी ५ वाजता मतमोजणी करण्यात आली. त्यापैकी १५२२ इतकी मते वैध तर ७७ मते अवैध ठरली. ठरावाच्या बाजूने ९३२ तर ठरावाच्या विरूध्द बाजूने ५९० मते पडली.
त्यामुळे नऊ सदस्यांनी सरपंच यांच्यावर दाखल केलेला ठराव ३४२ मतांनी मंजूर झाला. ठराव मंजूर झाल्यानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आदर्श नियमांचे पालन करून मतदान घेण्यात आले. तर राधानगरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
पंचवार्षिक निवडणूकीत गाफीलपनामुळे सरपंचपद हुकले. मात्र गेल्या तीन वर्षात विकासकामे खुंटल्याने ग्रामस्थातून नाराजी निर्माण झाली. याचेच पर्यावसन अविश्वास ठरावात झाले. विकासाच्या मुद्यावर ग्रामस्थांनी मतदान केल्याची प्रतिक्रिया माजी सरपंच दिलिपराव गुरव यांनी तरुण भारतशी बोलताना व्यक्त केली .