वृत्तसंस्था/ रिओ डी जानेरो
पूर्वार्धात लुकास पॅक्वेटाने नोंदवलेल्या एकमेव गोलाच्या बळावर ब्राझीलने पेरूचा पराभव करून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.
अर्जेन्टिना व कोलंबिया यांच्यात दुसरा उपांत्य सामना होत असून यातील विजयी संघाविरुद्ध ब्राझीलची जेतेपदाची लढत शनिवारी माराकाना स्टेडियमवर होणार आहे. ब्राझीलने जेव्हा जेव्हा या स्पर्धेचे यजमानपद भूषविले आहे, त्यावेळी त्यांनीच जेतेपद मिळविले आहे. यावेळीही त्यांनी त्याच दिशेने आगेकूच केली आहे. या सामन्यातील पहिल्या 20 मिनिटांत पेरूचा गोलरक्षक पेड्रो गॅलेसेने अप्रतिम गोलरक्षण करीत नेमार व रिचर्डलिसन यांचे प्रयत्न फोल ठरविले. त्यानंतर कॅसेमिरोचे दोन फटकेही त्याने ब्लॉक करीत संघावरील धोका टाळला होता. ब्राझीलने बराच वेळ खेळावर नियंत्रण ठेवले होते. पण पहिले यश मिळविण्यासाठी त्यांना 35 मिनिटांपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. डाव्या बाजूने आगेकूच करणाऱया नेमारने तीन खेळाडूंना बीट करून गोलजवळ ऍक्रॉस फटका मारत चेंडू पॅक्वेटाला दिला. त्याने दहा मीटर्सवरून व्हॉलीवर गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला.
पहिल्या सत्राच्या तुलनेत दुसऱया सत्रात मार्कोस लोपेझ व रॅझीयल गार्सिया यांच्या आगमनानंतर ब्राझीलचा खेळ उंचावला. त्यांच्या आक्रमक खेळामुळे पेरूलाही जास्त सतर्क व्हावे लागले. 2019 मध्ये उपविजेतेपद मिळविलेल्या पेरूनेही बरोबरीसाठी आक्रमण केले. दोन वेळा त्यांनी ब्राझीलच्या गोलपोस्टपर्यंत धडकही मारली होती. पण चेंडूवर ताबा ठेवण्यात ते सरस ठरले असले तरी त्यांना यश मिळविता आले नाही आणि ब्राझीलने अपराजित राहण्याची मालिका 13 व्या सामन्यापर्यंत वाढविली. सामन्यानंतर नेमारने अर्जेन्टिनाविरुद्ध अंतिम लढतीत खेळणे आवडेल, असे म्हटले होते. यापूर्वी 2007 मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीत ब्राझील-अर्जेन्टिना यांच्यात गाठ पडली होती. व्हेनेझुएलात झालेल्या त्या स्पर्धेत ब्राझीलने 3-0 असा विजय मिळवित जेतेपद मिळविले होते.
यावेळी याच दोन संघांत अंतिम लढत झाल्यास जगातील दोन सर्वोत्तम नंबर 10 खेळाडूंतील जुगलबंदी पहावयास मिळेल. दहा क्रमांकाची जर्सी वापरणारे नेमार व मेसी दोघेही बार्सिलोना क्लबकडून एकत्र खेळले असून येथील स्पर्धेत आतापर्यंत दोघांनीही चांगले प्रदर्शन केले आहे. नेमारने 2 गोल नोंदवले व तीन गोलसाठी साहय़ केले तर मेसीने 4 गोल नोंदवताना चार गोलसाठी साहय़ही केले आहे. ब्राझील हा या स्पर्धेचा विद्यमान विजेता आहे. मेस्सीने बार्सिलोनाकडून खेळताना अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. पण अर्जेन्टिनाकडून खेळताना त्याला असे यश मिळविता आलेले नाही. अर्जेन्टिनाने 1993 मध्ये कोपा अमेरिका स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर त्यांना एकही मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही. ही स्पर्धा अर्जेन्टिना व कोलंबिया संयुक्तपणे आयोजित करणार होते. पण कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने दोन्ही देशांनी स्पर्धा आयोजनास नकार दिला. त्यामुळे ऐनवेळी ब्राझीलमध्ये ही स्पर्धा आयोजित करावी लागली आहे.