कोलंबियाला पेनल्टीवर 3-2 फरकाने नमवले, ब्राझील-अर्जेन्टिना जेतेपदासाठी आमनेसामने भिडणार
ब्रासिलिया-ब्राझील / वृत्तसंस्था
रिओ डी जानेरिओ स्टेडियमवर रविवारी सकाळी कोपा अमेरिका स्पर्धेची फायनल रंगेल, त्यावेळी लायोनेल मेस्सीचा अर्जेन्टिना संघ व नेमारचा ब्राझील संघ जेतेपदासाठी आमनेसामने भिडणार आहेत. अर्जेन्टिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये कोलंबियाचा 3-2 असा धुव्वा उडवला आणि त्यानंतर अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट झाले. या स्पर्धेतील पहिल्या उपांत्य लढतीत ब्राझीलने पेरु संघाचा 1-0 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.
पेनल्टी शूटआऊटमध्ये गोलरक्षक इमिलियानो मार्टिनेझने केलेले 3 सेव्हज निर्णायक ठरले. येथील मेन गॅरिन्चा स्टेडियमवरील ही लढत निर्धारित वेळेत 1-1 अशी बरोबरीत राहिली होती. 1993 मध्ये कोपा अमेरिकाचे जेतेपद मिळवणाऱया अर्जेन्टिनाला त्यानंतर एकही मेजर टायटल जिंकता आलेले नाही. येथे जेतेपदाचा हा दुष्काळ संपुष्टात आणण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, ब्राझीलचा संघ देखील सध्या उत्तम बहरात असून मागील 6 पैकी 5 लढती त्यांनी जिंकल्या आहेत. घरच्या भूमीत कोपा अमेरिकेची फायनल कधीही गमवावी लागलेली नाही, हा इतिहास देखील त्यांच्या बाजूने आहे.
अर्जेन्टिनाला कोलंबियाविरुद्ध उपांत्य लढतीत खाते उघडण्यासाठी फारशी प्रतीक्षा करावी लागली नव्हती. अवघ्या 7 व्या मिनिटाला मार्टिनेझने मेस्सीच्या पासवर गोलजाळय़ाचा वेध घेतला. मेस्सीचा हा या हंगामातील पाचवा असिस्ट होता. नंतर 61 व्या मिनिटाला लुईस डायझने कोलंबियातर्फे बरोबरीचा गोल केला.
अर्जेन्टिना व कोलंबिया हे कोपा अमेरिका स्पर्धेचे मूळ सहयजमान होते. मात्र, स्पर्धेला 2 आठवडय़ांचा कालावधी बाकी असताना या देशांनी स्पर्धा भरवण्याबाबत असमर्थता कळवली आणि त्यानंतर ही स्पर्धा ब्राझीलला हलवण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. कोलंबियाचा संघ आता शनिवारी पहाटे 5.30 वाजता तिसऱया स्थानासाठी पेरुविरुद्ध प्ले-ऑफ लढतीत खेळेल व रविवारी पहाटे 5.30 वाजता ब्राझील-अर्जेन्टिना यांच्यात जेतेपदासाठी निर्णायक मुकाबला रंगणार आहे.
अर्जेन्टिना / मॅच स्टॅट / कोलंबिया
13 / शॉट्स / 14
4 / शॉट्स ऑन टार्गेट / 4
49… / बॉल पझेशन / 51…
383 / पासेस / 387
85… / पास ऍक्युरसी / 81…
20 / फाऊल्स / 27
4 / यलो कार्ड / 6
0 / रेड कार्ड / 0
8 / ऑफ साईड / 1
5 / कॉर्नर्स / 3