परिसरातील ग्रामस्थांनीही घेतला धसका
प्रतिनिधी / फोंडा
बेतोडा-बोरी बगलरस्ता येथे सापडलेल्या संशयिताला कारोनासदृश्य लक्षणे आढळून आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या संशयाने ढाब्यावरील कामगारांना धडकी भरली आहे. ढाब्यावर काम करीत असलेल्या फक्त दोघा कामगारांची चाचणी केली आहे. उर्वरीत कामगारांची चाचणी न केल्यामुळे हायपर टेंशन परिस्थिती निर्माण झाली आाहे, आमचीही चाचणी करावी अशी मागणी त्यानी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. काल शुक्रवारी सकाळी 11 वा.पर्यंत या कामगारांची चाचणी करण्यात आली नव्हती.
कोरोना संशयिताची सदर घटना बुधवार 13 रोजी सकाळी 11 वा. सुमारास उघडकीस आली होती. वापी-गुजरातहून आलेल्या संशयित ट्रकचालकांची कोरोना चाचणी सकारात्मक आली होती. पत्रादेवीमार्गे तो बेतोडा फोंडा येथे दाखल झाला होता. त्याने बगलरस्त्यावर ट्रान्सपोर्ट कार्यालयाजवळ मुक्काम घेतला होता. तिथे 3 बॅरलची डिलीवरी केल्यानंतर तो वेर्णा येथे औषधनिर्मिती कंपनीत माल पुरविण्यासाठी जाणार होता. दैव बलवत्तर तो अर्ध्यावरच भोवळ येऊन पडल्याने ही घटना उघडकीस आली. अन्यथा पत्रादेवी ते वेर्णापर्यत संक्रमण पसरवून हाहाकार माजला असता.
गुजरात ते बेतोडा कीती जणांच्या संपर्कात?
चाचणी केल्यानंतर तो कोरोना संशयित म्हणून निदान झाले होते. मात्र गुजरातहून मुंबईमार्गे गोव्यात दाखल होताना तो किती जणांच्या संपर्कात आला याची सविस्तर माहिती जाणून घेऊन चाचणी होणे गरजेचे आहे. सदर ट्रान्सपोर्ट कार्यालयात पाच सहा मालवाहू ट्रक पार्क करून ठेवण्यात आले असून त्याचीही रॅपिड चाचणी करावी अशी त्यांनी मागणी केली आहे. सद्यपरिस्थितीत ट्रान्सपोर्ट कार्यालय बंदावस्थेत असल्याचे चित्र आहे. मात्र परिसरातील भाजी व इतर दुकानात त्याचा संपर्क आल्यास कठोर पावले उचलण्याची गरज आहे. सदर कोरानाग्रस्त नेमका किती जणांच्या संपर्कात आला याची काळजीपुर्वक शहनिशा करावी अशी मागणी काजरवाडा येथील ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान फोंडा पोलिस व उपजिल्हाधिकाऱयांनी संशयित घेऊन आलेले वाहन सेनिटायझन करून घेतले आहे. तसेच एकूण पाच जणांच्या चाचणी करण्यात आल्याची माहिती दिली आहे. चेकपोस्टवरून मालवाहू ट्रक विनाचाचणी न करता दाखल होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. चेकपोस्टवर रॅपिड चाचणी सोय सरकारने तातडीने करणे गरजेचे आहे. या पार्श्वभुमीवर बेतोडा बगलरस्त्यावर थाटलेली सर्व दुकाने पुढील काही दिवस बंद ठेवण्याचे दाट शक्यता आहे.
फर्मागुडी येथे एकूण 38 जण कॉरन्टाईन
पत्रादेवी, मोले, पोळे तसेच रेल्वेमार्गे दाखल होणारे फेंडय़ाचे रहिवासी अशी ओळख दाखविणाऱयांना एस्कोर्ट करण्याची जबाबदारी फोंडा पोलिस स्थानकावर सोपणविण्यात आलेली आहे. सदर संशयितांना दोन दिवसांचे कॉरन्टाईन फर्मागुडी येथील टुरीस्ट कोटेजीस येथे रवानगी करण्यात येते. त्याचे नमुने उपजिल्हा इस्पितळात चाचणी करण्यात येते. सदर अहवाल नेगेटिव्ह आल्यानंतर दोन दिवसांच्या कॉरन्टाईनंतर घरी रवानगी करण्यात येते. सद्यपरिस्थित फर्मागुडी फोंडा येथे एकूण 38 जणांना कॉरन्टाईन करून ठेवण्यात आले आहे.
परप्रांतीयांचा नेमका आकडाच उपलब्ध नाही
बेतोडा औद्योगिक वसाहतीमुळे या भागात परप्रातीयांचा भरणा जास्त आहे. दिल्ली, उ.प्रदेश, बिहार, ओरीसा येथील लोक कामानिमित्त भाडय़ाच्या खोलीत राहत आहेत. पोलिसांनी किंवा संबंधित यंत्रणेने यासंबंधी सर्वेक्षण करून याची नोंदणी करावी. गोव्यात ग्रीन झोन जाहीर झाल्यानंतर त्याच्या नातेवाईक बेतोडय़ात दाखल झाल्याची दाट शक्यता काही ग्रामस्थांनी वर्तविली आहे. अन्यथा परराज्यातून विनाचाचणी दाखल होत असलेल्या मालवाहू ट्रकचालकांसारखी अनेक घटना नोंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक घरमालकांकडून भाडोत्रीचे सर्व तपशिल तसेच कोरोना लॉकडाऊन काळात कोण दाखल झाल्याची माहिती पोलिसांना द्यावी. तसेच आरोग्य सेतु ऍपवर नोंदणी झाल्यासही याकामी अंत्यत उपायकारक ठरू शकते अशी मागणी येथील सुज्ञ नागरिकांनी केली आहे.