वार्ताहर/ एकंबे
शहरातील दोन मोक्याच्या ठिकाणी व्हिडिओ गेम पार्लरमध्ये सुरु असलेल्या ऑनलाईन जुगारावर परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी रितू खोखर यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने कारवाई करत तब्बल 7 लाख 3 हजार 790 रुपयांचा ऐवज जप्त केला. पार्लरच्या चालकासह जुगार खेळणार्यांची धरपकड करण्यात आली. याप्रकरणी दहा जणांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील जुना मोटार स्टँड आणि आझाद चौकातील व्यापारी संकुलांमधील दुकान गाळ्यांमध्ये व्हिडिओ गेम पार्लर सुरु असून, तेथे ऑनलाईन जुगार खेळला जात असल्याची माहिती परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी रितू खोखर यांना खास बातमीदाराकडून मिळाली होती, त्यांनी या माहितीची पडताळणी केल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी (सातारा ग्रामीण) गणेश किंद्रे यांना माहिती देऊन दोन्ही व्हिडिओ गेम पार्लरची झडती घेण्यासाठी सर्च वॉरंट घेतले.
शुक्रवारी सायंकाळी परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी रितू खोखर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय नाळे, हवालदार सुधीर खुडे, मिलिंद कुंभार, अमोल सपकाळ, समाधान गाढवे, किशोर भोसले, प्रमोद जाधव, शीतल रासकर, पूनम रजपूत यांच्या पथकाने जुना मोटार स्टँडच्या पिछाडीस असलेल्या व्यापारी संकुलामधील दुकान गाळ्यामध्ये सुरु असलेल्या व्हिडिओ गेम पार्लरवर छापा टाकला. तेथे चौकशी केल्यावर कोणत्याही स्वरुपाचा परवाना नसल्याचे आढळून आले. व्हिडिओ गेम पार्लरमध्ये ऑनलाईन जुगार सुरु असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शासकीय पंचांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. एकूण 2 लाख 84 हजार 60 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस कर्मचारी प्रमोद जाधव यांनी फिर्याद दिली असून, सुमित कदम, दीपक मोरे, आदित्य ओसवाल, सचिन जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
आझाद चौक येथील व्यापारी संकुलातील गाळ्यामध्ये सुरु असलेल्या व्हिडिओ गेम पार्लरवर याच पोलीस पथकाने कारवाई केली. त्यांच्याकडे देखील कोणताही परवाना आढळून आला नाही. व्हिडिओ गेम पार्लरमध्ये ऑनलाईन जुगार सुरु असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शासकीय पंचांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. एकूण 4 लाख 19 हजार 730 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी हवालदार महादेव खुडे यांनी फिर्याद दिली आहे. रवींद्र नामदास, संजय सावंत, चंद्रकांत जाधव, राजेंद्र जाधव, संजय खरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बेकायदेशीर दारु वाहतुकीवर कारवाई; 84 हजारांचा मुद्देमाल जप्त
कोरेगाव शहरातील आसरे रस्त्यावर टाटा सुमो जीपमधून बेकायदेशीर दारु वाहतूक होणार असल्याची माहिती मिळताच परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी रितू खोखर यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने कारवाई करत तब्बल 83 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हवालदार प्रमोद चव्हाण व पोलीस कर्मचारी प्रमोद जाधव यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे टाटा सुमो जीप व त्यामध्ये देशी-विदेशी दारुचे बॉक्स असा एकूण 83 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अरुण जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.