मोटारसायकलस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल
वार्ताहर / एकंबे
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या धर्तीवर प्रशासनाने कोरेगाव शहरात गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस लॉकडाऊन केले आहे. गुरुवारी या लॉकडाऊनला शंभर टक्के यश मिळाले. दरम्यान, शहरात लॉकडाऊन असताना मोटार सायकल घेऊन मास्क न लावता फिरणार्या एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने केलेल्या लॉकडाऊनला जनता गार्भींयाने घेत नसल्याचे वारंवार दिसून आले आहे. गेले दोन दिवस पोलिसांनी धडक कारवाई करत शंभरहून अधिक मोटारसायकली जप्त केल्या आहेत, तर अनेकांच्या विरोधात जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. दूध, भाजीपाला, किराणा मालाच्या खरेदीबरोबरच औषधांच्या नावाखाली अनेकजण मोटारसायकल घेऊन फिरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत संपूर्ण कोरेगाव शहर गुरुवार आणि शुक्रवार असे दोन शंभर टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तहसीलदार रोहिणी शिंदे, मुख्याधिकारी अशोक कुंभार व पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी तातडीने अंमलबजावणी सुरु केली.
गुरुवारी सकाळपासून संपूर्ण शहर बंद होते, केवळ रुग्णालय-दवाखाने आणि औषध दुकाने सुरु होती. शुक्रवारी लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता एकही मोटारसायकल अथवा चार चाकी वाहन रस्त्यावर येऊ देण्यात आले नाही. शहरातील गोसावी वस्तीनजिक असलेल्या कालेकर कॉलनी परिसरात दुचाकीवरुन फिरत असताना रमेश प्रताप बर्गे, रा. गावंधर-चौथाई याच्या विरोधात जिल्हाधिकार्यांचे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी म्हणून कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी किशोर भोसले यांनी फिर्याद दिली.