कागदोपत्री विलगीकरण कक्षात, प्रत्यक्षात मात्र गावात
प्रतिनिधी/ दापोली
मुंबईतून चालत आलेल्या तरूणाला क्वारंटाईन केल्यानंतर त्याच्या स्वॅबचा अहवाल प्राप्त होण्याआधीच हातावर शिक्का मारून त्याला घरी सोडण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. अहवाल प्राप्त होण्यापूर्वी हा रुग्ण शहरात अनेकठिकाणी फिरला. सलूनमध्ये केस कापून नवे कपडेही खरेदी केली, अनेकांच्या गाठीभेटी घेत क्रिकेटचा आंनदही लुटला. मात्र तोच तरूण कोरोना पॉझीटीव्ह आल्याचे स्पष्ट झाल्याने दापोलीकर हादरले आहेत. प्रशासनाच्या या गलथान कारभारावर दापोलीकर संतप्त झाले आहेत. हातावर शिक्का मारून संबधीत रूग्णाला घरी सोडणाऱया आारोग्य कर्मचाऱयावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
28 एप्रिल रोजी मुंबईतून 27जण दापोलीमध्ये चालत आले. त्यांना वाटेमध्ये कुणी कसे अडवले नाही, ते आपापल्या गावी कसे पोहचले? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या 27जणांपैकी 11 जण दापोलीतून मंडणगडला गेल्याची माहिती प्रशासनाने दिली. हे तरूण मंडणगड मार्गे आल्याचे सांगितले जात असले तर ते दापोलीत येऊन पुन्हा मंडणगडात ते गेल्याने त्यांच्या दाव्याबाबत दापोलीकरांना संशय आहे. या 27 जणांपैकी मंगळवारी सायंकाळी वणौशी कोंढारणवाडी व शिर्दे येथील दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले.
28 एप्रिलाला दापोलीत येताच या सर्वाना शहरातील ए. जी. हायस्कूलमध्ये क्वारन्टाईन केल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. 2 मे रोजी पाठवलेल्या त्यांच्या स्वॅबचा अहवाल मंगळवारी सायंकाळी प्राप्त झाला. मात्र अहवाल प्राप्त झालेला हा रुग्णच विलगीकरण कक्षात नसल्याने दापोली प्रशासनाला घाम फुटला. याबाबत सखोल चौकशी केली असता कर्तव्यावर असणाऱया आरोग्य कर्मचाऱयाने त्या युवकाच्या हातावर होम क्वारन्टाईनचा शिक्का मारून त्याला घरी पाठवल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे प्रशासनाची पुन्हा धावाधाव सुरू झाली. त्या युवकाने शिर्दे येथील पत्ता नोंदवल्याने गावात यंत्रणा दाखल झाली. मात्र चौकशी करता युवकाचे कुटुंब अनेक वर्षे दापोली काळकाई कोंड येथे भाडय़ाच्या घरात राहत असल्याचे समजते. दापोलीतून त्याला ताब्यात घेऊन पुन्हा ए. जी. हायस्कूलमध्ये क्वारन्टाईन करण्यात आले.
प्रशासनाचा दावा फुसका
कागदोपत्री ए. जी. हायस्कुलमध्ये असलेला हा तरूण प्रत्यक्षात मात्र दापोलीत परिसरात खुलेआम फिरत असल्याचे एवढेच नव्हे तर मौजमजा करत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे संबधीत कोरोनाग्रस्त कोणाच्या संपर्कात आला नसल्याचा दावा करणाऱया प्रशासनाची घाबरगुंडी उडाली. यानंतर तो युवक ज्यांच्या सपर्कात आला त्यांची यादी करून 17 जणांना रातोरात क्वारन्टाईन केले.
आई-भावासोबत शिर्देवारी
होम क्वारन्टाईनच्या शिक्का मारल्यानंतर हा रूग्ण आई व भाऊ यांच्यासह मुळगाव असणाऱया शिर्दे येथे गेला. तेथे रेशन खरेदी केले व काजू बी विक्रीसाठी दापोलीत आणले. या काजू बिया त्याने दापोली एसटी स्टँड परिसरात विकल्याची चर्चा आहे. या पैशातून त्याने दापोली शहरात नवीन कपडेदेखील खरेदी केले. लॉकडाऊनच्या काळातही एका सलूनमाध्ये त्याने केस कापून घेतले. त्याच सायंकाळी काळकाई कोंड येथील मित्रांसमवेत तो क्रिकेटदेखील खेळल्याची चर्चा आहे. यानंतर या युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हादरलेल्या अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. दरम्यान, त्याच्या आई व भावाच्या सपर्कात आलेल्या लोकांचीही यादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
परिसर सील, निर्बंध कडक
कोरोनाग्रस्त युवक शहरात बिनदिक्कत फिरल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. त्यानंतर शहरातील निर्बंध अत्यंत कडक करण्यात आले आहेत. शहरात किंवा शहराबाहेर जाणाऱया वाहन व व्यक्तीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. काळकाईकोंड भागातील भारतनगर, नागरबुडी आदी परिसर पोलिसांनी सील करून येण्या-जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होणार
या युवकाच्या हातावर होम क्वारन्टाईनचा शिक्का मारून त्याला घरी पाठवणाऱया आरोग्य कर्मचाऱयावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती दापोलीचे उपविभागीय अधिकारी शरद पवार यांनी दिली. या युवकाने शहरात साथीचा आजार पसरवण्यास पुरक कृत्य केल्याने युवकावर व परवानगी नसतानाही तरूणाचे केस कापणाऱया सलूनचालकावरही गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती तहसीलदार समीर घारे यांनी दिली.
दापोलीकर संतप्त
प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अनेक दापोलीकरांना मनस्ताप सहन करावा लागत असून ते कोरोनाच्या विळख्यात सापडण्याची भीती निर्माण झाली आहे. मुंबईतून चालत येणारे हे युवक यंत्रणांच्या नजरेतून कसे सुटतात, विलगीकरण कक्षात असतानाही मुळ गावासह दापोली शहरातही बिनदिक्कत फिरतात, व कोरोना अहवाल येईपर्यंत प्रशासनाला त्यांचा मागमूसही नसतो ही गोष्ट अतिशय गंभीर असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया दापोलीकरांकडून व्यक्त होत आहे.