हिरेबागेवाडी, कुडची, बेळगावात गरज खबरदारीची
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व जिल्हय़ात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीच आहे. बेंगळूर येथून प्रसिद्ध होणाऱया हेल्थ बुलेटिनमध्ये रोज चढउतार असतात. बेळगावला चार दिवस दिलासा मिळाला की पाचव्या दिवशी रुग्णसंख्येत वाढ झालेली असते. अशा परिस्थितीत कोरोनाचा आलेख चढणार की घटणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
डिसेंबरअखेरपासून जगात कोरोनाचे थैमान सुरू झाले होते. बेळगावात मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ापासून पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत गेली. बेळगाव संबंधीचा पहिला अहवाल आरोग्य विभागाने 3 एप्रिल रोजी प्रसिद्ध केला. यामध्ये हिरेबागेवाडी, बेळगुंदी व कॅम्प येथील तिघा जणांचा समावेश होता.
त्यानंतर लगेच दोन दिवसांनी 5 एप्रिल रोजी कुडची येथील दोन महिलांसह चौघा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. 9 एप्रिल रोजी हिरेबागेवाडी येथील एकाच कुटुंबातील तिघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर ही संख्या वाढत गेली. आता एका हिरेबागेवाडीत कोरोनाग्रस्तांची संख्या 25 वर पोहोचली आहे.
तर रायबाग तालुक्मयातील कुडची येथे 16 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पहिल्या टप्प्यात ज्या तिघा जणांना लागण झाली होती. त्यांच्या संपर्कातून जिल्हय़ातील 54 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. हिरेबागेवाडी येथील रुग्ण क्रमांक 228 च्या संपर्कातून 25 जण कोरोनाग्रस्त झाले आहेत. तबलिगी जमातच्या धर्मसभेत भाग घेऊन गावी परतलेल्यांपासून फैलाव वाढला आहे. त्यामुळेच बेळगावचा समावेश रेड झोनमध्ये झाला आहे.
16 एप्रिल रोजी एकाच दिवशी हिरेबागेवाडी, संकेश्वर, येळ्ळूर, कुडची येथील 17 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर 25 एप्रिल रोजी एका हिरेबागेवाडीतील नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये लहान मुले, महिलांचाही समावेश होता. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या सहा जणांची सुटका करण्यात आली आहे.
बेळगावात कोरोनाचा शिरकाव कसा झाला? याच्या मुळापर्यंत पोहोचणाऱया आरोग्य विभागाला नवी दिल्ली येथील निजामुद्दिन मरकजहून आपापल्या गावी परतलेल्या तबलिगींच्या संपर्कातून कोरोनाचा फैलाव वाढल्याचे आढळून आले आहे. रोज प्रसिद्ध होणाऱया हेल्थ बुलेटिनमध्येही अशीच माहिती दिली जाते. एका बेळगाव जिल्हय़ातून शंभरहून अधिक जणांनी तबलिगी जमातच्या धर्मसभेत भाग घेतला होता.
कोरोना थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर उपक्रम हाती घेतले आहेत. आरोग्य, पोलीस, महसूल, आशा व अंगणवाडी कार्यकर्त्या रस्त्यावर उतरल्या आहेत. रविवारी व सोमवारी दोन्ही दिवशी बेळगावला दिलासा मिळाला असला तरी बेळगावहून पाठविलेल्या आणखी 984 जणांच्या स्वॅब तपासणीचा अहवाल यायचा आहे. यातील किती जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आणि किती जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह येणार, याकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागून राहिले आहे. सध्याचा लॉकडाऊन 3 मे रोजी संपणार आहे. त्यानंतरही बेळगावात लॉकडाऊन वाढण्याची शक्मयताच अधिक आहे. कारण बेळगाव रेडझोनमध्ये आहे.