दहा जणांनी प्राण गमावले : फैलाव आणखी वाढणार, दगावलेल्यांची संख्या 286
प्रतिनिधी/ पणजी
कोरोनामुळे शनिवारी तब्बल 10 जणांना मृत्यू आला. त्याद्वारे मृत्यू पावलेल्यांची संख्या 286 झाली आहे. राज्यात सध्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. हे सर्व दहा रुग्ण गोमेकॉत मृत्यू पावले. यापैकी पाच रुग्णांचा मृत्यू गोमेकॉत भरती केल्यानंतर 24 तासांतच झाला.
मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये 70 वर्षीय मदुराई तामिळनाडू येथील पुरुषाचा समावेश आहे. नानोडा येथील 42 वर्षीय महिलेचा यामध्ये समावेश आहे. बोर्डा मडगाव येथील 72 वर्षीय पुरुष, चिखली येथील 63 वर्षीय पुरुष, सडा वास्को येथील 65 वर्षीय पुरुष, बार्देशमधील 28 वर्षीय महिला, पर्वरी येथील एक 84 वर्षीय पुरुष व 82 वर्षीय पुरुष, मांद्रे येथील 51 वर्षीय पुरुष तर कुडका येथील 68 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
511 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात कोरोनाचे थैमान वाढत चालले असून कोरोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. शनिवारी आतापर्यंतचे सर्वाधिक 740 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यामुळे सक्रीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5323 एवढी झाली आहे. शनिवारी 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला. 511 रुग्ण शनिवारी कोरोनामुक्त म्हणूनही घोषित करण्यात आले.
राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसऱया बाजूने मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. कोरोनाचा फैलाव वाढण्याची शक्यता सरकारी पातळीवरून व्यक्त करण्यात आल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
डिचोली तालुक्यातील कोरोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. डिचोली, सांखळी हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. डिचोलीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 235 वर पोहोचली आहे, तर सांखळीतील रुग्णसंख्या 312 एवढी झाली आहे. पेडणेची रुग्णसंख्या 233 तर वाळपईची रुग्णसंख्या 197 झाली आहे. म्हापशाची रुग्णसंख्या 186 तर पणजीची रुग्णसंख्या 286 झाली आहे. हळदोणाची रुग्णसंख्या 135, बेतकीच 115, कांदोळीची 165 तर कासारवर्णेची रुग्णसंख्या 113 झाली आहे. कोलवाळची रुग्णसंख्या 125, खोर्लीची 143, चिंबलची 144, पर्वरीची रुग्णसंख्या 311 व मयेची रुग्णसंख्या 93 एवढी झाली आहे. कुडचडेची रुग्णसंख्या 81, काणकोणची 91, मडगावची 430 तर वास्कोची रुग्णसंख्या 292 झाली आहे, बाळ्ळीची रुग्णसंख्या 53, कासावलीची रुग्णसंख्या 130, चिंचिणीची 41, कुठ्ठाळीची 172, कुडतरीची 73, लोटलीची 87, मडकईची 94, केपेची 108, सांगेची 85, शिरोडाची 56, धारबांदोडाची 95, नावेलीची 77 तर हॉटस्पॉट ठरलेल्या फोंडाची रुग्णसंख्या 371 झाली आहे.